वाघोली परिसरात वीजयंत्रणेसाठी 13 कोटींची कामे सुरु

electric
Share this News:

पुणे, दि. 12 ऑगस्ट 2020 : जलदगतीने विस्तारीत होणाऱया वाघोली परिसरातील वीजग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेच्या विविध कामांसाठी 12 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कंत्राटदारांकडून कामे देखील सुरु झाली आहेत. या कामांमुळे वीज वितरण यंत्रणेचा कायापालट होणार आहे. तसेच जुनाट यंत्रणाही बदलण्यात येत आहे. दरम्यान, ग्राहकांशी सतत संवाद साधून अडचणी समजून घेत देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात तांत्रिक बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

मुळशी विभाग अंतर्गत वाघोली शाखे अंतर्गत सुमारे 60 हजार वीजग्राहक आहेत. महावितरणकडून लोणीकंद उपकेंद्रातील एकूण 22 वीजवाहिन्यांद्वारे वाघोली परिसरात वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे तसेच वाढत्या नागरीकरणामुळे वीज वितरण यंत्रणेवर ताण येत असल्याने महावितरणकडून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण तसेच देखभाल व दुरुस्तीचे कामे नियमितपणे करण्यात येत आहे. या परिसरातील वीजग्राहकांशी सातत्याने संवाद साधून तक्रारींचे निवारण करण्यासोबतच स्थानिक वीजयंत्रणेत बदल व सुधारणा करण्यात येत आहे. परिणामी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सद्यस्थितीत कमी झाले आहे.

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून लोणीकंद उपकेंद्र ते पूर्वरंग सोसायटीमधील पूर्वरंग उपकेंद्रापर्यंत 42 किलोमीटरच्या चार उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरु केले होते. वीजयंत्रणेवरील ताण कमी होण्यासोबतच सुरळीत वीजपुरवठ्यासह पर्यायी स्वरुपाचा वीजपुरवठा वाघोली परिसराला उपलब्ध होणार होता. मात्र काही अडचणी व राईट ऑफ वेमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या चारही भूमिगत वाहिन्या कार्यान्वित झाल्यास संपूर्ण वाघोली परिसराला मोठा फायदा होणार आहे.

वाघोली परिसरातील नागरीकरण व विजेची वाढती मागणी पाहता महावितरणने एसएसएमआर (system strengthening under metro region) योजनेतून 12 कोटी 67 लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे. त्याची कामेही युद्धपातळीवर सुरु झालेली आहेत. यामध्ये नवीन रिंग मेन युनिट, एबी स्विच, फिडर पिलर्स बसविणे, नवीन वितरण रोहित्र, रोहित्रांची क्षमतावाढ, 15 किलोमीटर नवीन भूमिगत वाहिनी, 35 किलोमीटर वीजतारा बदलणे आदी 25 प्रकारचे कामे करण्यात येत आहेत. यासोबतच यंदाच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामामध्ये रोहित्रांतील तेलाची पातळी वाढविणे, गंजलेले व सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, सुरक्षिततेसाठी वीजवाहिन्यांना स्पेसर्स किंवा पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, लोंबकळणाऱ्या वीजतारांचे झोल काढणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची दुरुस्ती तसेच क्लिनिंग व झाकणे लावणे, नवीन किटकॅट बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, नादुरुस्त सर्व्हीस वायर बदलणे, रोहित्रांच्या केबल बदलणे इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाघोली परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे अत्यल्प झाले आहे.

जेड रेसिडेंसीमध्ये 10 दिवसांत एकूण 77 मिनिटे वीज खंडित – वाघोली येथील 900 घरांच्या जेड रेसिडेंसीमध्ये एकूण 9 स्वतंत्र इमारती आहेत. त्यातील काही इमारतीमधील रहिवाशांनी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार विविध माध्यमांद्वारे केली आहे. मात्र वस्तुस्थिती पडताळून पाहिली असता गेल्या 10 दिवसांमध्ये विविध वेळेत झालेल्या खंडित वीजपुरवठ्याचा एकूण कालावधी 77 मिनिटांपेक्षा अधिक आढळून आला नाही. त्यातही 10 मिनिटांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत वीजपुरवठा खंडित नव्हता. वादळ, पाऊस, झाडे, फांद्या पडणे व इतर विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास या इमारतींना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी तांत्रिक उपाय करण्यास 5 ते 10 मिनिटांचा कालावधी आवश्यक आहे. विशेष म्हणजे जेड रेसीडेंसीमधील काही इमारतींकडे कॉमन मीटरच्या वीजबिलांची 52 लाख रुपयांची थकबाकी होती. सद्यस्थितीतही काही इमारतींकडे  फेब्रुवारीपासून 19 लाख रुपयांची थकबाकी आहे. मात्र महावितरणने कोविड प्रादुर्भावामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली नाही.