स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला कोरोना मुक्त रिक्षांना विभागीय आयुक्तांच्या हस्ते हिरवा बावटा

Share this News:

 पुणे दि. 13 /08/2020 – परवा 15 ऑगस्टला आपण सर्व जण देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करू. यंदा त्यावर कोरोना संकटाचे सावट आहे. मात्र अशी संकटेच व्यक्ती,समाज आणि व्यवस्था म्हणून आपली परीक्षा बघत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीच सर्वजण कोरोनाच्या संकटाशी एकजुटीने लढत आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त ही लढाई पुढे नेणारा ‘ कोरोना मुक्त रिक्षा ’ हा उपक्रम रिक्शा पंचायत सुरू करत आहे. या उपक्रमातील रिक्षांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

           टाळेबंदी शिथिल झाल्यावर 1 ऑगस्ट 2020  पासून, सर्वांना प्रवासी सेवा देण्यासाठी ऑटो रिक्षा खुल्या झाल्या. आहेत. तरीही एकूण रिक्षांपैकी 25-30%च रिक्षा सध्या रस्त्यावर दिसतात. पण सकाळी 7-8 वा. प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर आलेल्या रिक्षा चालकांना दु.1 वाजला तरी 1ले भाडे(भवानी) न झाल्याचा व दिवसात 100ते 150 ₹ ही कमाई होत नाही, असा अनुभव येत आहे. याचे कारण लोकांमध्ये असलेली भिती. ही भिती घालवण्यासाठी आणि प्रवास करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ कोरोना मुक्त रिक्षा  कल्पना उपयोगी पडेल. म्हणून सुरवातीला अशा 100 कोरोना मुक्त रिक्षांचा ताफा रिक्षा पंचायत रस्त्यावर आणत आहे. कोरोना मुक्त रिक्षा1.चालक व प्रवासी यांच्या मध्ये पारदर्शक पडदा असेल.2.प्रवासी चढताना व उतरताना रिक्षा निर्जंतुक करण्यासाठी रिक्षा चालकाकडे निर्जंतुकीकरण द्रव्याचा पंप असेल. 3.रिक्षाचालकाकडे वैयक्तिक वापरासाठी सॅनिटायझर बाटली असेल. 4.रिक्षा चालकाने मुखपट्टी (फेसमास्क) व फेसशील्ड लावले असेल. 5.या रिक्षा वेगळ्या ओळखण्यासाठी रिक्षावर  दर्शनी भागात कोरोना मुक्त रिक्षा या मथळ्याचे स्टिकर लावलेले असेल.

          या ताफ्याला शुक्रवार 14ऑगस्ट 2020, दुपारी 4 वा.  विभागीय आयुक्त कार्यालय आवार येथे , राव यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर होणारा हा उपक्रम औचित्यपूर्ण व दिशादर्शक ठरेल. यामुळे मिशन बिगिन अगेन लाही बळ मिळणार आहे.