एका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’
17/1/2020- जगण्याची शर्यत प्रत्येकाला जिंकायची असते. अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण धावतही असतो. पण, अनेकदा धावता धावता आपण जगणंच विसरून जातो. किती जगावं, यापेक्षा कसं जगावं हे आपल्याच हाती असतं. सकारात्मक व वेगळा विचार जगण्याच्या लढाईत आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो हे सांगू पाहणारा ओम छंगानी फिल्म्स निर्मित एका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’ ३१ जानेवारीला पहायला मिळणार आहे.
‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं आयुष्याचे मर्म सांगणाऱ्या ‘प्रवास’ चित्रपटात अभिजात इनामदार व लता इनामदार या जोडप्याच्या आनंददायी प्रवासाची गोष्ट उलगडणार आहे नात्यांचे वेगवेगळे कंगोरे हा चित्रपट अधोरेखित करतो. सरळमार्गी आयुष्य जगणारे अभिजात इनामदार आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वत:चा असा वेगळा निर्णय घेतात. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला व त्यांच्या कुटुंबाला कशी कलाटणी देणार? हे दाखवतानाच, लढत राहण्यातच खरी मजा असते हाच खरा ‘प्रवास’ असतो तो ज्याचा त्याने ठरवायचा आणि करायचा हा विचार नकळतपणे देऊन जातो.
मनालीमध्ये उणे १८ डिग्रीमध्ये शूटिंग करत असताना प्रतिकूल परिस्थितीत वेळेत काम व्हावे व सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी अशोक व पद्मिनीजी प्रयत्नशील होते. अशोकमामा ज्यांनी मागील २०-२५ वर्षांपासून कार चालवणे सोडून दिले होते. ह्या चित्रपटासाठी त्यांनी त्यांच्या भूमिकेला गरज असल्याने मुंबईतील गर्दीच्या रस्त्यावर कार चालवली.. प्रत्येक कलाकाराने समरसून आपल्या भूमिका करत ‘जे शेष आहे, ते विशेष आहे’ याचीच प्रचिती देत जणू सिनेमाच्या आशयाला खरं करत त्यांच्या जीवन प्रवासाच्या सफलतेचं कारण सांगितल्याचे लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर सांगतात.
वेगळा विचार करणारेच नव्याचा वेध घेऊ शकतात हा विचार मला ‘प्रवास’ च्या माध्यामतून प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा होता. उत्तरं शोधणारा हा प्रवास प्रत्येकाला नवी दिशा देणारा असेल असा विश्वास लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात.
‘प्रवास’ या चित्रपटाची खासियत म्हणजे मनाली तसेच अमेरिकेतील लॉस एंजलिस, लॉस वेगास, फिनिक्स या नयनरम्य स्थळी चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. याच्या संगीताची खासियत म्हणजे याचं आॅर्केस्ट्रेशन झेक प्रजास्ताकाची राजधानी प्रागमध्ये करण्यात आलं आहे. या निमित्ताने बॉलीवूड संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. सोनू निगम, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, हरीहरन या आघाडीच्या गायकांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे.
चित्रपटात अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार आहेत. चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे. पवन पालीवाल कार्यकारी निर्माते आहेत. अनिल थडानी या चित्रपटाचे वितरक आहेत.
३१ जानेवारीला ‘प्रवास’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.