हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

Support Our Journalism Contribute Now

मुंबई, दि. 13 :- हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा आढावा तसेच पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे तसेच पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असलेल्या पीएमआरडीएचे कार्य पुणे जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गिका क्र. 3 साठी आवश्यक राज्य शासनाच्या मालकीची 15 हजार चौ. मी. जागा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर- हडपसर- फुरसुंगी- शेवाळवाडी मेट्रोसाठी भूमिसंपादन तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पीएमआरडीएच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्रोत, पीएमआरडीएच्या माध्यमातून कामे सुरू असलेल्या रिंगरोड, रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना, टाऊनशिप, इंद्रायणी नदीसुधार, प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

मंत्रालयात आयोजित या बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.