दहीहंडी उत्सव रद्द करून अकरा मारुती कोपरा मंडळातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात
पुणे, 18/8/2019 : महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर येथे पूरामुळे घराघरात पाणी शिरले. अनेकांची घरे वाहून गेली आणि संसार उध्वस्त झाले. पूर ओसरला असला तरीदेखील संपूर्ण संसार पुन्हा एकदा उभा करण्याचे मोठे आव्हान पूरग्रस्त नागरिकांसमोर आहे. पूरग्रस्त बांधवांच्या पाठिशी आपण कायम उभे आहोत, असा विश्वास देण्यासाठी तसेच मोडलेला संसार पुन्हा एकदा सुरळीतपणे उभा रहावा, यासाठी दहीहंडी उत्सव रद्द करून शुक्रवार पेठेतील अकरा मारुती कोपरा मंडळाने जय भारत मित्र मंडळ व सरस्वती क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने संसारोपयोगी सर्व वस्तू, धान्य, भाजीपाला अशा स्वरुपाचा मदतीचा हात देऊ केला आहे. तसेच मंडळातील कार्यक र्त्यांनी या भागात स्वच्छतेची मोहिम देखील हाती घेतली.
अकरा मारुती कोपरा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख, सनी चव्हाण, मयुर मोरे, ओंकार मोरे, कौस्तुभ देशमुख, गणेश कदम, लक्ष्मण जगताप, किरण सणस, पप्पू बांदल, राहुल खिलारे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला आहे. खडक पोलिस स्टेशनचे भरत जाधव यांनी देखील या मदत केंद्राला भेट दिली.
राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, सांगली, कोल्हापूर येथील नागरिकांना पूराचा खूप मोठा फटका बसला आहे. येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपले बांधव संकटात असताना आपण उत्सव साजरा करण्यापेक्षा या निधीतून मदतीचा हात पुढे केला पाहिजे. या विचारातून पूरग्रस्त बांधवांचा संसार उभा रहावा याकरिता दहीहंडी उत्सव रद्द करून कुरुंदवाड येथील गावात ६० कुटुंबियांना ताटे, वाट्या, गॅस शेगडी, चटई, ब्लँकेट, वह्या, पुस्तके, तांदूळ, गहू, तेल,चहा, साखर, कांदे, बटाटे, औषधे अशा संसारोपयोगी वस्तू, शैक्षणिक साहित्य, धान्य, भाजी-पाला या गोष्टींची मदत करण्यात आली. तसेच मंडळातील ७५ कार्यकर्त्यांनी याच भागात स्वच्छता करून श्रमदान देखील केले.