सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
बारामती, दि. 19 आॅगस्ट 2019 : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 5 रुपये 09 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 79 पैसे अधिक 1 रुपया 30 पैसे वहन (व्हिलींग) आकार असे वीजदर आहेत. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 5 रुपये 09 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत.
गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले हे मीटर हे प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी व नसल्यास त्वरीत अर्थिंग करून घ्यावे. वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास विद्युत प्रवाहापासून अपघाताची शक्यता असते. प्रामुख्याने मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये (टिना) विद्युत प्रवाह येऊ शकता. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी तसेच पावसाच्या पाण्यापासून वीज संचमांडणीही सुरक्षित ठेवावी.
याशिवाय संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वेगवान हवा किंवा पावसाच्या पाण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाहीत किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी. सुरक्षित अंतरापेक्षा ही लाईटिंग अधिक उंचीवर असल्याची तपासणी करीत राहावी. सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास 24 तास सुरु असणार्या टोल फ्री क्रमांक 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.