बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जनजागृती अभियान

पुणे दि. 6 :- राज्यातून बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकामध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत संपूर्ण राज्यात कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानामध्ये विविध संस्थाचालक, मालक यांच्या बैठका घेवून बाल व किशोरवयीन (प्रतिबंध व नियमन) कामगार अधिनियम,1986 ची माहिती देणे, तसेच यावर चर्चासत्रे आयोजित करून आस्थापना मालक, चालक यांचेकडून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबत हमीपत्र लिहून घेणे, दुकाने तसेच आस्थापनेमध्ये बालकामगार कामावर न ठेवणेबाबतचे स्टीकर दर्शनी भागात प्रदर्शित करणे, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असणा-या पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे, वस्तीमधील लोकांना बाल कामगार निर्मूलन कार्यक्रमात सामावून घेणे, विविध प्रसार माध्यमातून बालकामगार प्रथेविरूध्द जनजागृती करणे, पथनाट्य प्रचार फेरी इत्यादी माध्यमातून जनजागृती करणे तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरामध्ये बाल कामगार प्रथा विरोधी स्वाक्षरी मोहिम राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते सदर अभियानाचे उद्घाटन करुन प्रत्यक्ष अभियानास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे 7 नोव्हेंबर 2019 रोजी होणार असल्याचे कामगार उप आयुक्त व्ही.सी. पनवेलकर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

Support Our Journalism Contribute Now