भोसरी व्हिजन 20-20; व्हिजन एज्युकेशन अंतर्गत दिघीत महापालिकेची होणार अत्याधुनिक शाळा

Share this News:

पिंपरी, 27 जुलै 2019 – भोसरी व्हिजन 20-20 व्हिजन एज्युकेशन अंतर्गत दिघीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अत्याधुनिक इंग्रजी आणि मराठी माध्यमांची शाळा बांधली जाणार आहे. त्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर सादरीकरण झाले असून त्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. शाळेसाठी अर्थसंकल्पात 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कामाची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून दिघीतील पहिले आरक्षण विकसित होणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक विकास डोळस यांनी दिली.

प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमध्ये गोकुळ कॉलनी परांडेनगर येथे शाळेचे आरक्षण होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ताब्यात आले नव्हते. नगरसेवक विकास डोळस यांनी पाठपुरावा करुन शाळेचे आरक्षण ताब्यात घेतले. अत्याधुनिक मराठी आणि इंग्रजी माध्यमांची शाळा बांधण्यात येणार आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. लवकरच त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. शाळेमध्ये संगणक विभाग, प्रशस्त प्रार्थना हॉल, खेळाचे मैदान, अत्याधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, जेवणासाठी स्वतंत्र हॉल, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हॉल अशा अनेक सुविधा असणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी रॅम्पची सुविधा असणार आहे.

याबाबत बोलताना विकास डोळस म्हणाले, ”महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून दिघी-बोपखेल येथील पहिले आरक्षण विकसित होणार आहे. तेही शाळेचे आरक्षण विकसित होत असल्याने आनंद होत आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आरक्षण ताब्यात घेण्यात आले. भोसरी व्हिजन 20-20 व्हिजन एज्युकेशन अंतर्गत दिघीत महापालिकेची अत्याधुनिक शाळा बांधली जाणार आहे. इंटरनॅशनल स्टॅन्डर्सकडून शाळेचे डिझाईन केले आहे. इंग्रजी आणि मराठी माध्यमांची शाळा असणार आहे”.

”दिघीमध्ये सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने आहेत. आपला मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा, असे पालकांचे स्वप्न असते. आर्थिक परिस्थिती नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवू शकत नाहीत. त्यासाठी दिघीत इंग्रजी माध्यमाची शाळा चालू करुन त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर सादरीकरण झाले असून त्यांनी मान्यता दिली असल्याचे”, डोळस यांनी सांगितले.