पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (28 जुलै 2019)
नवी दिल्ली, 28 जुलै 2019 : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही ना काही करू पाहतोय, सांगू पाहतोय- एक भावना जाणवत आहे, आणि या सर्वामध्ये खूप काही असे आहे की ज्याचा मला समावेश करायचा आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे सर्वाचाच समावेशही करू शकत नाही. असं वाटतय की, तुम्ही माझी परीक्षा पाहत आहात. तरीही, तुमच्याच गोष्टी या ‘मन की बात’च्या धाग्यात गुंफून पुन्हा एकदा तुमच्यातच वाटून टाकायची इच्छा आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, मागच्या वेळेस मी प्रेमचंदजी यांच्या काही गोष्टींच्या पुस्तकावर आपण चर्चा केली होती आणि जे पुस्तक वाचू, त्यातील काही गोष्टी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून सर्वाना शेअर करायच्या, असे आपण ठरवलं होतं. मला असं दिसलंय की, मोठ्या प्रमाणावर लोकांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांची माहिती परस्परांना दिली. लोक विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, इतिहास, संस्कृती,व्यवसाय, जीवन चरित्र अशा अनेक विषयांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांवर चर्चा करत आहेत, यामुळे मला छान वाटलं. काही लोकांनी तर मला असा सल्ला दिला आहे की, मी आणखी काही पुस्तकांबद्दल बोलावं. ठीक आहे, मी आणखी काही पुस्तकांबद्दल आपल्याशी नक्की चर्चा करेन. पण मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, मी खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तक वाचण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. पण एक फायदा मात्र असा झाला आहे की, तुम्ही जे काही लिहून पाठवता, त्यावरून अनेक पुस्तकांच्या विषयांबद्दल माहिती जाणून घेण्याची संधी मला मिळते. परंतु, हा जो मागील एक महिन्याचा अनुभव आहे, त्यावरून मला असं वाटतं की, या उपक्रमाला आपण पुढे घेऊन जायला हवं. आपण नरेंद्र मोदी अॅपवर पुस्तकांचा एक कोपरा कायमस्वरूपी बनवूया आणि जेव्हा आपण एखादे नवीन पुस्तक वाचू, त्याबद्दल तिथे लिहू, चर्चा करू आणि तुम्ही या पुस्तकांच्या कोपऱ्यासाठी एखादे चांगले नावही सुचवू शकता. हा पुस्तकांचा कोपरा बुक कॉर्नर वाचक आणि लेखकांसाठी एक सक्रीय मंच बनेल, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही लिहित रहा,वाचत रहा आणि मन की बात च्या सर्व सहकाऱ्यांकरता ती शेअरही करत रहा.
मित्रांनो, असं वाटतं की, जल संरक्षण- मन की बात मध्ये जेव्हा मी या विषयाला स्पर्श केला होता, पण आज असा अनुभव येत आहे की, माझ्या म्हणण्याच्या आधीच जल संरक्षण तुमच्या मनाला स्पर्शून जाणारा आणि सामान्य माणसाच्या आवडीचा विषय होता. आणि मला असा अनुभव येत आहे की, पाण्याच्या विषयावर आजकाल भारतीयांच्या मनाला हलवून सोडले आहे. जल संरक्षणासाठी देशभरात अनेक प्रभावी प्रयत्न सुरु आहेत. लोकांनी पारंपरिक पद्धतीबाबत तर माहिती शेअर केली आहे. माध्यमांनी जल संरक्षणविषयावर अनेक नाविन्यपूर्ण मोहिमा सुरु केल्या आहेत. सरकार असेल, एनजीओज् असतील, युद्धपातळीवर काही ना काही करत आहेत. सामूहिक प्रयत्नांचे हे सामर्थ्य पाहून खूप छान वाटत आहे, खूप आनंद होत आहे. जसे की, झारखंडच्या रांचीपासून थोडेसे दूर, ओरमांझी भागाच्या आरा केरम गावात, तिथल्या रहिवाशांनी जल व्यवस्थापनाच्या बाबतीत जो काही उत्साह दाखवला आहे, तो प्रत्येकासाठी एक उदाहरण ठरला आहे. ग्रामीण लोकांनी श्रमदान करून पहाडातून वाहणाऱ्या एका झऱ्याला एक निश्चित दिशा देण्याचे काम केले आहे. आणि तीही शुद्ध स्वदेशी पद्धत. यामुळे केवळ मातीची धूप आणि पिकाचे नुकसान थांबलं आहे, असं नाही तर शेतांना पाणीही मिळू लागलं आहे. ग्रामीण भागातील लोकांनी केलेलं हे श्रमदान, आता संपूर्ण गावासाठी जीवनदानापेक्षा कमी नाही. आपल्या सर्वाना हे जाणून आनंद होईल की, ईशान्येतील सुंदर असं राज्य मेघालय आपलं जल धोरण तयार करणारं देशातील असं पहिलं राज्य झालं आहे.मी त्या तिथल्या सरकारचं अभिनंदन करतो.
हरियाणामध्ये, ज्या पिकांना पाणी कमी लागतं, अशा पिकांच्या शेतीला चालना दिली जात आहे आणि शेतकऱ्यांचं काही नुकसान होत नाही.मी हरियाणा सरकारचं विशेष अभिनंदन करतो की, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांना पारंपरिक शेतीपासून कमी पाणी लागणाऱ्या शेतीकडे वळवलं.
आता तर सणांचे दिवस आले आहेत. सणांच्या निमित्ताने अनेक जत्रा भरत असतात. जल संरक्षणासाठी या जत्रांचा का उपयोग करून घेऊ नये? जत्रांमध्ये समाजातील प्रत्येक थरातले लोक जात असतात. या जत्रांमध्ये आपण पाणी वाचवण्याचा संदेश खूप परिणामकारक रित्या देऊ शकतो, प्रदर्शनं भरवू शकतो, नुक्कड नाटक करू शकतो, उत्सवांबरोबर आपण जल संरक्षणाचा संदेश खूप सोप्या पद्धतीनं पोहचवू शकतो.
मित्रांनो, जीवनात काही गोष्टी उत्साह भरून टाकतात आणि विशेषत्वाने लहान मुलांचे यश, त्यांची कामगिरी आपणा सर्वाना नवीन उर्जा देते आणि म्हणून आज काही मुलांच्या बाबत मला बोलावं वाटत आहे आणि ही मुलं आहेत, निधी बाईपोटू, मोनीष जोशी, देवांशी रावत, तनुष जैन, हर्ष देवधरकर,अनंत तिवारी, प्रीती नाग, अथर्व देशमुख, अरोन्यातेश गांगुली आणि हृतिक अला-मंदा!
मी यांच्याबद्दल जे काही सांगेन, त्यामुळे तुम्हीसुद्धा अभिमान आणि उत्साहाने भरून जाल. आपल्या सर्वाना माहितच आहे की, कर्करोग हा असा शब्द आहे की, त्याला सारं जग घाबरतं. असं वाटतं की, मृत्यू दरवाजावर उभा आहे पण या सर्व दहा मुलांनी आपल्या जीवनाच्या लढाईत,केवळ कर्करोगाला, कर्करोगासारख्या घटक रोगाला पराभूत केलं असं नाही तर आपल्या पराक्रमानं सर्व जगात भारताचं नाव उज्वल केलं आहे. क्रीडामध्ये आपण नेहमीच पाहतो की, खेळाडू स्पर्धा जिंकल्यावर किंवा पदक मिळवल्यावर विजेते बनतात, पण ही एक दुर्मिळ संधी होती की, ही मुलं स्पर्धेत भाग घेण्याअगोदरच विजेते होते आणि तेही जीवनाच्या लढाईत विजेते!
वास्तविक, या महिन्यात मॉस्कोमध्ये वर्ल्ड चिल्ड्रन विनर्स क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ही एक आगळीवेगळी अशी क्रीडास्पर्धा असते, ज्यात कर्करोगातून वाचलेल्या तरुण म्हणजे जे लोक आपल्या जीवनात कर्करोगाशी लढून बाहेर आले आहेत, तेच लोक भाग घेतात. या स्पर्धेत, नेमबाजी, बुद्धिबळ, जलतरण, धावणे, फुटबॉल आणि टेबल टेनिस अशा स्पर्धांचे आयोजन केले गेले. आमच्या देशाच्या या सर्व दहा विजेत्यांनी या स्पर्धेत पदक जिंकली. यात काही खेळाडूंनी तर एकापेक्षा अधिक पदक जिंकली आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आकाशाच्याही पलीकडे, अंतराळात, भारताच्या यशाबद्दल, चांद्रयान २ मोहिमेबद्दल तुम्हाला जरूर अभिमान वाटला असेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
राजस्थानमधील जोधपुरचे संजीव हरिपुरा, कोलकात्याचे महेंद्रकुमार डागा, तेलंगणाचे पी. अरविंद राव अशा अनेकांनी, देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक लोकांनी मला नरेंद्र मोदी अॅप आणि माय गव्हवर लिहिलं आहे आणि मन की बातमध्ये चांद्रयान-2 वर चर्चा करण्याचा आग्रह केला आहे.
वास्तविक, 2019 हे वर्ष अंतराळ प्रगतीच्या दृष्टीनं भारतासाठी खूप चांगलं राहिलं आहे.आमच्या शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये ए सॅट अवकाशात सोडला होता आणि त्यानंतर चांद्रयान-2. पण निवडणुकीच्या धामधुमीत ए सॅटसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या घटनेवर जास्त चर्चा होऊ शकली नव्हती. आपण ए सॅट क्षेपणास्त्राच्या मदतीनं, केवळ तीन मिनिटात, 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह पाडण्याची क्षमता प्राप्त केली. असं यश मिळवणारा भारत जगातला चौथा देश बनला आणि आता 22 जुलैला पूर्ण देशानं, चांद्रयान-2 नं श्रीहरीकोटाहून अंतराळात आपली पावलं कशी टाकली, हे अभिमानानं पाहीलं. चांद्रयान-2 च्या उड्डाणाच्या छायाचित्रांनी देशवासियांना सन्मान आणि जोश, प्रसन्नतेने भरून टाकलं.
चांद्रयान-2, ही मोहीम अनेक अर्थानं विशेष आहे. चांद्रयान-2 चंद्राबद्दलच्या आमच्या समजुती अधिक स्पष्ट करेल. यामुळे, आम्हाला चंद्राच्या बाबतीत अधिक सविस्तर माहिती मिळू शकेल, पण जर तुम्ही मला विचाराल की, चांद्रयान-2 पासून मला काय दोन मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तर मी सांगेन, या दोन गोष्टी आहेत, फेथ आणि फिअरलेसनेस म्हणजे विश्वास आणि निर्भयता! आपल्याला आपली प्रतिभा आणि क्षमता यावर विश्वास असला पाहिजे, आपली प्रतिभा आणि क्षमता यावर विश्वास ठेवला पाहिजे. चांद्रयान-2, संपूर्णपणे भारतीय स्वरुपात आहे, हे ऐकून आपल्याला आनंद होईल. ते हृदय आणि वृत्ती या दोन्ही बाबतीत भारतीय आहे. संपूर्ण स्वदेशी पद्धतीची मोहीम आहे. जेव्हा नव्या नव्या क्षेत्रांत काही नवीन करण्याची, नाविन्यपूर्ण उत्साहाची चर्चा होते, तेव्हा आमचे वैज्ञानिक सर्वश्रेष्ठ आहेत, जागतिक दर्जाचे आहेत, हे या मोहीमेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
दुसरा महत्वाचा धडा हा आहे की, कोणत्याही संकटानं घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं आमच्या शास्त्रज्ञांनी, विक्रमी वेळेत, रात्रीचा दिवस करून, सर्व तांत्रिक प्रश्न सोडवून चांद्रयान-2 अवकाशात सोडलं, हे काम अभूतपूर्व आहे. वैज्ञानिकांची ही महान तपस्या सर्व जगानं पाहिली. याचा आपल्या सर्वाना अभिमान वाटला पाहिजे आणि अडचण येऊनही चांद्रयान पोहोचायची वेळ बदलली नाही, याचंही अनेकांना खूप आश्चर्य वाटतं. आपल्याला जीवनात अनेकदा टेम्पररी सेटबॅक तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करण्याचं सामर्थ्य आपल्यातच असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. चांद्रयान-2 मोहीम देशातल्या युवकांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रेरित करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. शेवटी, विज्ञान हाच तर विकासाचा मार्ग आहे. आता आम्हाला, सप्टेंबर महिन्याची अधिरतेने प्रतीक्षा आहे, जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर-विक्रम आणि रोव्हर-प्रज्ञान उतरेल.
आज ‘मन की बात’च्या माध्यमातून, मी, देशातल्या विद्यार्थी मित्रांना, युवक साथीदारांना, एका अत्यंत मनोरंजक स्पर्धेच्या बाबत माहिती देऊन देशाच्या युवक आणि युवतींना निमंत्रित करतो-एक क्विझ कॉम्पिटीशन! अंतराळाशी संबंधित कुतूहल, भारताची अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान-या क्विझ कॉम्पिटीशनचे मुख्य विषय असतील, जसे की, रॉकेट अवकाशात सोडण्यासाठी काय काय करावं लागतं. उपग्रहाला कक्षेत कसं प्रस्थापित करता येतं. आणि उपग्रहापासून आपण काय काय माहिती प्राप्त करतो. ए सॅट काय असतं. खूप गोष्टी आहेत. माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला,स्पर्धेचा तपशील दिला जाईल.
मी युवा मित्र, विद्यार्थी यांना, त्यांनी या क्विझ कॉम्पिटीशनमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या सहभागानं, स्पर्धेला अधिक मनोरंजक आणि अविस्मरणीय करावे, अस आवाहन करतो. मी शाळा,पालक, उत्साहित मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विशेष आग्रह करतो की, त्यांनी आपल्या शाळेला विजयी करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी.
सर्वात रोमांचक गोष्ट तर ही आहे की, प्रत्येक राज्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, भारत सरकार स्वतःच्या खर्चानं, श्रीहरिकोटाला घेऊन जाईल आणि सप्टेंबरमध्ये त्यांना जेव्हा चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल,त्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळेल.या विजयी विद्यार्थ्यांसाठी ही एक ऐतिहासिक घटना असेल,पण त्यासाठी तुम्हाला क्विझ कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा लागेल, सर्वाधिक गुण मिळवावे लागतील,आपल्याला विजयी व्हावं लागेल.
मित्रांनो, माझी ही सूचना तुम्हाला निश्चितच चांगली वाटली असणार. मजेदार संधी आहे ना? तर तुम्ही क्विझमध्ये भाग घ्यायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांना भाग घ्यायला प्रेरित करा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, तुम्ही एक निरीक्षण केलं असेल.आपल्या मन की बातनं वेळोवेळी स्वच्छता अभियानाला गती दिली आहे आणि या पद्धतीनं स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांनाही मन की बात ला नेहमीच प्रेरणा दिली आहे. पाच वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास आज अनेकांच्या सहभागातून स्वच्छतेचे नवनवीन मानदंड प्रस्थापित करत आहे.आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श स्थिती प्राप्त केली आहे, असं मुळीच नाही, पण ज्या पद्धतीनं हागणदारीमुक्त गावांपासून ते सार्वजनिक स्थळांपर्यंत स्वच्छतेच्या बाबतीत जे यश मिळालं आहे, ते एकशे तीस कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती आहे,पण आम्ही इथपर्यंत येऊन थांबणार नाही. हे अभियान आता स्वच्छतेकडून सौंदर्याकडे पुढे वाटचाल करत निघालं आहे. आता काही दिवसांपूर्वी मी मीडियामध्ये योगेश सैनी आणि त्यांच्या टीमची कहाणी पाहत होतो. योगेश सैनी अभियंते आहेत आणि अमेरिकेतली आपली नोकरी सोडून भारतमातेची सेवा करण्यासाठी भारतात परत आले आहेत. त्यांनी काही काळ अगोदर दिल्लीला स्वच्छच नाही तर सुंदरही बनवण्याचा विडा उचलला. त्यांनी आपल्या टीमसमवेत लोधी गार्डनमधील कचराकुंड्यांपासून सुरूवात केली. स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून, दिल्लीच्या अनेक भागांना, सुंदर पेंटिंग्जनी सजवलं. ओव्हरब्रिज आणि शाळेच्या भिंतींपासून ते झोपडपट्टीपर्यंत आपली कला त्यांनी दाखवायला सुरूवात केली तेव्हा लोकांचीही साथ मिळत गेली आणि एक प्रकारे हा सिलसिला सुरू झाला. तुम्हाला आठवत असेल की, कुंभमेळ्याच्या काळात प्रयागराजला रस्त्यावरील पेंटिंग्जनी कसं सजवण्यात आलं होतं. मला समजलं की, योगेश सैनी आणि त्यांच्या टीमनं त्यातदेखील खूप मोठी भूमिका निभावली होती. रंग आणि रेषांचा भलेही आवाज येत नसेल,पण त्यांच्यापासून बनलेल्या चित्रांनी जे इंद्रधनुष्य तयार होते, त्यांचा संदेश हजार शब्दांपेक्षा अधिक कितीतरी जास्त प्रभावी सिद्ध होतो आणि स्वच्छता अभियानाच्या सौंदर्यातही आपण त्याचा अनुभव घेत असतो. कचऱ्यापासून संपत्ती बनवण्याची संस्कृती आमच्या समाजात विकसित व्हावी, हे आमच्यासाठी फार आवश्यक आहे. एका तऱ्हेनं सांगायचं तर, कचऱ्यापासून सोनं बनवण्याच्या दिशेनं आम्हाला पुढे जायचं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी, मी ‘माय गव्ह’वर एक खूपच मनोरंजक प्रतिक्रिया वाचली. जम्मू काश्मिरच्या शोपियाँ इथं राहणाऱ्या भाई महंमद अस्लम यांची ती प्रतिक्रिया होती.
त्यांनी लिहिलंय, ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकायला चांगला वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो की, मी माझ्या राज्यात जम्मू-काश्मीरमध्ये कम्युनिटी मोबलायझेशन कार्यक्रमाच्या-बँक टु व्हिलेज आयोजनात सक्रीय भूमिका बजावली. जून महिन्यात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. असे कार्यक्रम दर तीन महिन्यांनी आयोजित केले गेले पाहिजेत, असं मला वाटतं. त्याचबरोबर, कार्यक्रमाच्या ऑनलाईन देखरेखीचीही व्यवस्था असली पाहिजे. माझ्या मते,हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात जनतेनं सरकारशी थेट संवाद साधला.
भाई महंमद अस्लमजी यांनी हा संदेश मला पाठवला आणि तो वाचल्यावर बँक टु व्हिलेज कार्यक्रमाबाबत जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढली आणि जेव्हा मी याबाबत सविस्तर माहिती घेतली तेव्हा पूर्ण देशाला याची माहिती असली पाहिजे, असं मला वाटलं. काश्मीरचे लोक विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी किती उत्सुक आहेत, किती उत्साही आहेत, याची कल्पना या कार्यक्रमाने येते. या कार्यक्रमात प्रथमच, मोठमोठे अधिकारी थेट गावांपर्यंत गेले. ज्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी कधी पाहिलंही नव्हतं, ते स्वत: त्यांच्या दारात गेले, ज्यामुळे विकासकामांमध्ये येत असलेल्या अडचणी समजून घेता येतील, समस्या दूर केल्या जाऊ शकतील. हा कार्यक्रम आठवडाभर चालला आणि राज्यातल्या सर्व सुमारे साडेचार हजार पंचायतींमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सरकारी योजना आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्यापर्यंत सरकारी सेवा पोहचतात की नाही, हेही जाणून घेतलं. पंचायतींना कसं आणखी मजबूत बनवता येईल, त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, त्यांच्या सेवा सामान्य मानवी जीवनात काय प्रभाव टाकू शकतील. ग्रामस्थांनीही मोकळेपणानं आपल्या समस्या मांडल्या. साक्षरता, लिंग गुणोत्तर, आरोग्य, स्वच्छता, जल संरक्षण, वीज, पाणी,मुलींचं शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
मित्रांनो, हा कार्यक्रम काही केवळ सरकारी औपचारिकता नव्हता की, अधिकारी दिवसभर गावामध्ये फिरून परत आले, पण या वेळेला अधिकाऱ्यांनी दोन दिवस आणि पंचायतीत एक मुक्कामही केली. यात त्यांना गावात राहण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने भेटण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विभागापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम रंजक करण्यासाठी आणखी काही गोष्टींचाही समावेश केला होता. खेलो इंडिया अंतर्गत मुलांसाठी क्रीडास्पर्धा ठेवली होती. खेळाचं साहित्य, मनरेगाची जॉब कार्ड आणि अनुसूचित जाती आणि जमातीची प्रमाणपत्रेही तिथंच वाटली. आर्थिक साक्षरता कॅम्प लावले. कृषी, फलोत्पादन अशा सरकारी विभागांकडून स्टॉल्स लावून सरकारी योजनांची माहिती दिली गेली. एक प्रकारे, हे आयोजन म्हणजे विकासोत्सव झाला, लोकसहभागाचा, जनजागृतीचा उत्सव बनला. काश्मीरचे लोक विकासाच्या या उत्सवात मोकळेपणाने सहभागी झाले. आनंदाची गोष्ट ही आहे की, ‘बँक टु व्हिलेज’ कार्यक्रमाचं आयोजन अशा दूरवरील भागांमध्ये केलं होतं की, जिथं पोहचण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना दुर्गम रस्त्यानं जाऊन, पहाड चढून कधी कधी एक दिवस तर कधी दीड दिवस पायपीट करावी लागली. हे अधिकारी अशा सीमावर्ती पंचायतींमध्येही गेले, जिथे ज्या सीमेपलिकडून गोळीबाराची सतत भीती असते. इतकंच नाही तर, शोपियाँ, पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील अति संवेदनशील प्रदेशातही अधिकारी निर्भयपणे गेले. काही अधिकारी तर गावात झालेल्या स्वागतानं इतके भारावून गेले की, दोन दिवसांपेक्षा अधिक काळ गावात थांबले. या प्रदेशांमध्ये ग्रामसभा होणं, त्यात मोठ्या संख्येनं लोकांनी भाग घेणं आणि आपल्यासाठी योजना तयार करणं, हे सारंच खूप सुखद आहे. नवीन संकल्प, नवा जोश आणि शानदार परिणाम असे कार्यक्रम आणि त्यात लोकांचा सहभाग हे काश्मीरच्या आमच्या बंधुभगिनीना सुशासन हवं आहे, हेच दर्शवतो. विकासाची शक्ती बॉम्ब आणि बंदुकीच्या शक्तीवर नेहमीच भारी ठरते, हेही यावरून सिद्ध होतं. लोक विकासाच्या मार्गात द्वेष निर्माण करू पाहत आहेत, अडसर पैदा करू पाहत आहेत, ते आपल्या कुटील हेतूंमध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, हेही स्पष्ट आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित श्रीमान दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांनी आपल्या एका कवितेत श्रावण महिन्याचा महिमा असा सादर केला आहे. या कवितेत त्यांनी म्हटलं आहे, होडिगे मडिगे आग्येद लग्ना। अदराग भूमी मग्ना।
अर्थात पावसाचा शिडकावा आणि पाण्याच्या धारा यांचे बंध आगळेच आहेत आणि त्यांचं सौंदर्य पाहून पृथ्वी मग्न आहे.
संपूर्ण भारतवर्षात अलग अलग संस्कृती आणि भाषक लोक श्रावण महिना आपापल्या पद्धतीनं साजरा करतात. या मोसमात आपण जेव्हा जेव्हा आसपास पाहतो, तर असं वाटतं की, जणू पृथ्वीनं हिरवळीचा शालू परिधान केला आहे. सर्वत्र एका नव्या उर्जेचा संचार होतो. या पवित्र महिन्यात अनेक भक्त कावड यात्रा आणि अमरनाथ यात्रेला जातात, तर काही जण नियमितपणे उपवास करतात आणि जन्माष्टमी आणि नागपंचमीसारख्या सणांची उत्सुकतेनं प्रतीक्षा करतात. याच काळात, भाऊबहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला राखीपौर्णिमा सणही येतो. श्रावण महिन्याची चर्चा सुरू आहे, तर आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, यावेळी अमरनाथ यात्रेत गेल्या चार वर्षांपेक्षा सर्वात जास्त भाविक सहभागी झाले आहेत. एक जुलैपासून आतापर्यंत तीन लाखांहून अधिक तीर्थयात्रींनी पवित्र अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे. 2015 मध्ये पूर्ण 60 दिवसापर्यंत चालणाऱ्या या यात्रेत जितके भाविक सहभागी झाले होते, त्यापेक्षा जास्त भाविक यावेळी फक्त 28 दिवसात सहभागी झाले आहेत.
अमरनाथ यात्रेच्या यशाबद्दल मी खास करून जम्मू काश्मीरचे लोक आणि त्यांच्या आतिथ्यशीलतेचीही प्रशंसा करतो. जे लोक यात्रेहून परत येतात, ते राज्याच्या जनतेची प्रेमाची उब आणि आपलेपणाच्या भावनेनं भारावून जातात. या सर्व गोष्टी भविष्यात पर्यटनासाठी खूप लाभदायक सिद्ध होणार आहेत. उत्तराखंडमध्येही, यावर्षी जेव्हापासून चारधाम यात्रा सुरू झाली आहे, तेव्हापासून दीड महिन्यात 8 लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धामचं दर्शन घेतलं आहे, असंही मला सांगण्यात आलं आहे. 2013 मध्ये आलेल्या भीषण आपत्तीनंतर, प्रथमच, इतक्या विक्रमी संख्येनं तीर्थयात्री तिथं पोहचले आहेत.
माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की, ज्या भागांमध्ये मान्सूनच्या दरम्यान नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं असतं, अशा भागांमध्ये तुम्ही जरूर जा. आपल्या देशाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि आपल्या देशातल्या लोकांची भावना समजून घेण्यासाठी पर्यटन आणि तीर्थयात्रा यापेक्षा मोठा शिक्षक नाही. श्रावणाचा हा सुंदर आणि रसरशीत महिना आपल्या सर्वांमध्ये नवीन उर्जा, नवी आशा आणि नव्या उमेदीचा संचार घडवो, अशी मी आपल्या सर्वांसाठी शुभकामना करतो. याचप्रकारे, ऑगस्ट महिना भारत छोडो आंदोलनाची स्मृती घेऊन येतो. 15 ऑगस्टसाठी आपण काही विशेष तयारी करावी, अशी माझी इच्छा आहे. स्वातंत्र्याचं हे पर्व साजरं करायची नवी पद्धत शोधावी. लोकसहभाग वाढला पाहिजे. 15 ऑगस्ट लोकांचा, जनांचा उत्सव कसा होईल, याची काळजी निश्चित घ्या. दुसरीकडे, हीच वेळ आहे की, देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये देशवासी पूरानं ग्रस्त झाले आहेत. पूरामुळे अनेक प्रकारचं नुकसान सहन करावं लागतं. पूराच्या संकटात सापडलेल्या सर्व लोकांना मी आश्वासन देतो की, केंद्र, राज्य सरकारांच्या सहकार्यानं पूरग्रस्तांना हर प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय जलद गतीनं काम करत आहे. आम्ही जेव्हा टीव्ही पाहतो तेव्हा पावसाचा एकच पैलू दिसतो-सर्व बाजूनं पूर, साचलेलं पाणी, वाहतूक कोंडी, मान्सूनचं दुसरं चित्र-ज्यात आनंदी झालेला आमचा शेतकरी, कूजन करणारे पक्षी, वाहणारे झरे, हिरवाईचा शालू पांघरलेली धरती-हे पाहण्यासाठी तर आपल्याला स्वतः कुटुंबियांसह बाहेर पडावं लागेल. पाऊस, ताजेपणा आणि आनंद-म्हणजे फ्रेशनेस आणि हॅपीनेस-दोन्ही आपल्यासमवेत आणतो. हा मान्सून आपल्या सर्वांना सतत आनंदानं भरून टाको, ही माझी इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कुठं सुरू करायची, कुठे थांबायचं, खूप अवघड काम वाटतं, पण वेळेची मर्यादा असते. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा येईन. पुन्हा भेटेन. महिनाभरात तुम्ही मला खूप काही सांगा. मी येणाऱ्या ‘मन की बात’मध्ये त्यांचा समावेश करायचा प्रयत्न करेन आणि माझ्या युवामित्रांना पुन्हा आठवण करून देईन. क्विझ कॉम्पिटिशनची संधी सोडू नका. श्रीहरिकोटामध्ये जी संधी मिळणार आहे ती कोणत्याही परिस्थितीत हातची जाऊ देऊ नका.
आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद! नमस्कार!