मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

Share this News:

पुणे, दि. 14 : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे आज अनेकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले.

पूरग्रस्त भागात गतीने पुनर्बांधणी व्हावी, पूरग्रस्त भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार नव्याने उभा करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विठठल्‍ परशुराम महाजन यांच्याकडून 50 हजार, इंदापूर नगरपरिषद, इंदापूर अधिकारी, कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन एक लाख 16 हजार 882, श्री राजेंद्र सोपान भोसले यांच्याकडून 5 हजार 555, कै.सौ. शशिकला कोठारी ट्रस्ट यांच्याकडून 10 हजार, श्रीरंग प्रकाश दर्प, पेट कम्फर्ट संस्था यांच्याकडून 5 हजार तर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिवसभरात विश्वस्त मंडळ श्री. क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये, श्री. सुभाष पी. शेलार यांच्याकडून 11 हजार रूपये, श्री. गौरीशंकर निलकंठ कल्याणी व श्रीमती रोहीणी गौरीशंकर कल्याणी यांच्याकडून एक लाख रूपये, कल्याणी फोर्ज ली. यांच्याकडून एक लाख रूपये, मुळशी तालुका पोलीस पाटील सेवकाची सहकारी पतसंस्था मर्या. यांच्याकडून 25 हजार रूपये यांच्यासह विविध संस्था, संघटना मान्यवरांकडून मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे येत आहेत.

००००