गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा : डॉ. के. व्यंकटेशम
पुणे, 18/8/2019 : “समाजात कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी असे वेगवेगळे सेल सुरु करून त्यामार्फत अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा आणि शहराला सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मात्र, समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे,” असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात फिक्की फ्लो संस्थेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात डॉ. व्यंकटेशम बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी फिक्की फ्लो पुणेच्या चेअरपर्सन रितू छाब्रिया, सदस्य अनिता सणस यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. व्यंकटेशम म्हणाले, “महिला सुरक्षा, गुन्हेगारीला आळा, वाहतूक कोंडी, सायबर गुन्हेगारी आदी गोष्टींवर पुणे पोलीस चोवीस तास काम करीत आहे. नागरिकांना चांगले आणि सुरक्षित आयुष्य कसे जगता येईल, यासाठी सतत नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी पोलीस काका, दामिनी पथक यांसारखे विशेष विभाग कार्यरत आहेत. या सगळ्या उपक्रमांना नागरिकांची साथ मिळाली, तर शहर गुन्हेगारी मुक्त व्हायला वेळ लागणार नाही.” महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल फिक्की कडूनही गौरविण्यात आल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी नमूद केले.
पुणे शहराला सुरक्षित बनविण्यासाठी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन रितू छाब्रिया यांनी दिले.