स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त भारत ही महात्मा गांधींना 150व्या जयंतीनिमित्त खरी कार्यांजली ठरेल – पंतप्रधान

Share this News:

मुंबई, 25 ऑगस्ट 2019 : स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत, प्लास्टिमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त देशाची खरी कार्यांजली ठरेल, असे प्रतिपादन मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 

आपल्यातील एकात्म भावनेचे दर्शन घडवून प्रत्येक जण आपापल्या परीने गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी काही ना काही सेवाकार्य करू शकतो. सर्वांनी महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त सेवाकार्य करुन, गांधीजींना कार्यांजली वाहावी, असा आग्रह मोदी यांनी केला. गांधीजींशी संबंधित विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्या विषयीची आपली मते समाज माध्यमांवर मांडण्याची सूचनाही मोदी यांनी केली.

 

 

गांधी जयंतीच्या दोन आठवडे आधी म्हणजेच 11 सप्टेंबरपासून आपण घर आणि परिसर स्वच्छ करून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम पुढे नेऊया, असे मोदी म्हणाले. तसेच आपण सर्वांनी पुढाकार घेऊन एकदाच वापर केल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प प्रत्यक्षात राबवूया, असे आवाहनही पंतप्रधानांनी देशबांधवांना केले.

 

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कुपोषणाविरुद्धच्या चळवळीवरही भर दिला. देश कुपोषणाविरुद्ध एक मोठी लढाई लढतो आहे. देशाच्या विविध कोपऱ्यात पोषक आहारासाठी विविध उपक्रम सुरू आहेत, आपण सर्वांनी त्या पोषण अभियानात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

 

 

लहान बाळांच्या उष्टावणाच्या वेळी मोफत पोषक आहार देण्याचा गुजरात सरकारचा उपक्रम तसेच नाशिक मधील मूठभर धान्य चळवळ मोहिम अशा पोषण आहार मोहिमांचे कौतुक पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केले.

 

गेल्या काही वर्षात भारतात वाघांची संख्या दुप्पट झाली असून, भारतात सध्या 2967 वाघ आहेत आणि व्याघ्र संरक्षण हे जंगल वाचविण्याच्या मोहिमेतील एक फार महत्त्वाचे पाऊल आहे असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर आपण देशभरात ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ म्हणजेच निरोगी भारत अभियान सुरू करणार आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले. या मोहिमे अंतर्गत आपण स्वत:सोबतच संपूर्ण देश निरोगी करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवूया, असे आवाहनही त्यांनी केले.