बारामती मंडलमध्ये आयपीडीएस, डीडीयूजीजेवाय योजनांची कामे पूर्ण

Share this News:

बारामती, दि. 24 जुलै 2019 : शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या बारामती, केडगाव व सासवड विभागातील एकात्मिक ऊर्जा विकास आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनांमधील नवीन वीजयंत्रणेची व जुन्या यंत्रणेच्या सक्षमीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.

 

वीजग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण, आधुनिकीकरणाची कामे सातत्याने केली जात आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या सहाय्यातून बारामती परिमंडलमधील एकूण 26 शहरी भागांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना (Integrated Power Development Scheme) तसेच ग्रामीण भागासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात येत आहे.

 

बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, शिरूर, भोर, इंदापूर व पुरंदर या तालुक्यांमध्ये या दोन्ही योजनांची विविध कामे पूर्ण झाली आहे. यामध्ये 2 नवीन उपकेंद्र, 8 उपकेंद्रांची क्षमतावाढ, 129 उपकेंद्रांचे आधुनिकीकरण व नुतणीकरण, 633 नवीन वितरण रोहित्रे व क्षमतावाढ, 701 किलोमीटर लघु व उच्चदाब नवीन ओव्हरहेड व भूमिगत वीजवाहिनींचे कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ग्रामीण भागात दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून 10,473 नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.

 

बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, सासवड, जेजुरी, भोर, दौंड व शिरूर या 7 शहरांमध्ये आयपीडीएस योजनेमधून वीजयंत्रणेची विकास कामे करण्यात आली. यामध्ये बारामती एमआयडीसी उपकेंद्र रोहित्राची क्षमतावाढ, 60 नवीन वितरण रोहित्र व क्षमतावाढ, 125 किलोमीटर लघु व उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी, वीजसुरक्षेसाठी तसेच वीजचोरी टाळण्यासाठी 7 किलोमीटर एरीयल बंच केबल अशी विविध कामे करण्यात आली आहेत. यामध्ये भूमिगत वीजवाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरु आहे.

 

यासोबतच ग्रामीण भागासाठी असलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून पुरंदर तालुक्यात मांडकी येथे नवीन 33/11 केव्ही उपकेंद्राचे तसेच शिरसोडी (ता. इंदापूर), जांबूत (ता. शिरुर) व दहिटणे (ता. दौंड) उपकेंद्रांचे सक्षमीकरण व क्षमतावाढीचे काम पूर्ण झाले आहे. 63 किलोमीटरच्या उच्च व लघुदाब वाहिनी तसेच 20 नवीन वितरण रोहित्रांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतून बारामती मंडलमधील 504 बीपीएल व 2852 गरीब अशा एकूण 3356 कुटुंबांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तसेच माळसिरस, गुळुंचे (ता. पुरंदर), मुर्ती, जळगाव सुपे (ता. बारामती), दापोडी (ता. दौंड), जांबुत, कासारी व करांडी (ता. शिरुर) या संसद आदर्श गावांमध्ये या योजनेतून नवीन वीजयंत्रणा उभारण्याचे व वीजजोडण्यांचे काम करण्यात आले आहे.

 

या दोन्ही योजनांमधील कामांमुळे शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम व आधुनिक झालेली आहे. त्यामुळे वीजग्राहकांना योग्य दाबासह सुरळीत वीजपुरवठा करण्यासोबतच नवीन वीजजोडण्या देण्याची क्षमता निर्माण झाली आहे.