जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे आमदार महेश लांडगे यांची मागणी

Share this News:

पिंपरी, 23 ऑगस्ट – च-होली, मोशी, डुडुळगाव येथील रस्ते आणि विविध विकासकामे करण्यासाठी जागा भूसंपादनाचे प्रस्ताव पिंपरी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. काही कामांसाठी निधी देखील मंजूर झाला आहे. परंतु, जागा ताब्यात नसल्याने विकास कामे करता येत नाहीत. त्यासाठी तातडीने महापालिकेच्या ताब्यात जागा देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांना देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने भूसंपादनाचे विषय मार्गी लावण्याची सूचना जिल्हाधिका-यांना केली आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) जिल्हा नियोजन समितीची बैठक पुण्यात झाली.या बैठकीत आमदार लांडगे यांनी जिल्हाधिका-यांडून पिंपरी महापालिकेकडे जागा ताब्यात देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील काही विकास कामे रखडली आहेत. याकडे पालकमंत्री पाटील यांचे लक्ष वेधले. च-होली, डुडुळगाव, मोशी, चिखली परिसरातील अनेक जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्या प्रक्रियेला जिल्हाधिका-यांकडून विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यासाठी तातडीने प्रलंबित भूसंपादनाचे विषय मार्गी लावण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली.लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी देण्याची मागणीही आमदार लांडगे यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. भोसरी मतदारसंघातील लांडेवाडी, बालाजीनगर, खंडेवस्ती, संभाजीनगर, गवळीमाथा, गणेशनगर, महात्मा फुलेनगर, निगडी सेक्टर क्रमांक 22 येथील दलित वस्त्यांमधील विविध स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी एक कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची मागणीही लांडगे यांनी केली.