बारामती, केडगावचे कर्मचारी करताहेत कोकणातील वीजयंत्रणेची दुरुस्ती

Support Our Journalism Contribute Now

बारामती, दि. 23 जून 2020 : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी महावितरणच्या बारामती, केडगाव विभागातील 16 अभियंते व कर्मचारी संततधार पावसात कोकणातील हर्णे बंदर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत.

 

गेल्या 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. प्रामुख्याने रायगड व रत्नागिरीसह इतर काही जिल्ह्यातील वीजयंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7800 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते.

 

बारामती परिमंडलाकडून बारामती व केडगाव विभागातील दोन कनिष्ठ अभियंता व 14 जनमित्र दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळील पालंदे व कुडवळे गावात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. समुद्रकिनारी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसल्याने हर्णे बंदर व इतर गावातील सुमारे 95 टक्के वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. यामध्ये नवीन वीजखांब रोवणे, वीजतारा ओढणे, खड्डे करण्यापासून वीजखांबांची खांद्यावरून वाहतूक करण्यापर्यंत सर्व कामे महावितरणचे कर्मचारी करीत आहेत.

 

या दुरुस्ती कामादरम्यान संततधार पाऊस हजेरी देत असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वीजयंत्रणेची कामे करावी लागत आहेत. मात्र चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरु आहेत. या पथकांमध्ये कनिष्ठ अभियंता रोहित राख (बारामती) व पप्पू पिसाळ (केडगाव) तसेच रमेश गोडसे, इस्माईल सय्यद, पोपट खोसे, शैलेंद्र धाईंजे (सर्व बारामती), अजेश काळे, गोरख गावडे, अमित पवार, नितीन भापकर, मनोहर शेळके, नितीन मेंगावडे, दशरथ वाळसे (सर्व केडगाव) यांचा समावेश आहे. अत्यंत प्रतिकूल स्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारणीचे प्रयत्न करणाऱ्या या सर्वांचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता  सुनील पावडे यांनी कौतुक केले आहे.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.