गडकोट किल्ले भाड्याने दिले तर मंत्र्यांना फिरु देणार नाही – सचिन साठे

Share this News:

पिंपरी (6 सप्टेंबर 2019) : महाराष्ट्रातील गडकोट किल्ले हेरीटेज हॉटेल्स व लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारच्या मंत्र्यांना पिंपरी चिंचवड शहरात फिरु देणार नाही. असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.
भाजपा सेनेने मागील पाच वर्षांत घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे. याची परिणिती म्हणून मागील दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने लाल किल्ला भांडवलदारांच्या घशात घातला. त्याच मार्गाने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार आता, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि हजारों मावळ्यांच्या प्राणांची आहुती देऊन राखलेले पंचवीस गडकोट किल्ले भांडवलदारांना दिर्घ मुदतीच्या कराराने भाड्याने देऊन पैसे कमविण्याच्या मागे लागले आहे. यातील बहुतांशी किल्ले पश्चिम महाराष्ट्रात आहेत. किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज व पुरंदर हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. राज्यातील सर्व किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे आश्वासन पाच वर्षांपूर्वी भाजप सेनेने महाराष्ट्राला दिले होते. परंतू आता पर्यटन व रोजगारांच्या नावाखाली हे गडकोट किल्ले भांडवलदारांना हॉटेल व लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय म्हणजे रोजगार निर्मितीचे सर्व प्रयोग फसले असून राज्याची गंगाजळी रिकामी झाली असल्याचे हे लक्षण आहे. स्वराज्यात या गडकोट किल्ल्यांच्या व महिला भगिनींच्या रक्षणासाठी मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले. त्या किल्ल्यांचे पावित्र्य राखून नियोजनबद्द पध्दतीने त्यांचे संवर्धन करुन महाराजांच्या शूर कर्तबगारीचा अमुल्य ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याएैवजी त्याच पवित्र भूमीवर हे सरकार हॉटेल्स्‌ उभारुन रोजगाराच्या नावाखाली जनतेच्या अस्मिता पायदळी तुडविण्याचा आणि महिलांना नाचवून पैसे कमविण्याचा उद्योग करु पाहत आहे. या नालायक आणि निष्क्रिय सरकारला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्रातील मावळ्यांनी आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे.