स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

Share this News:

मुंबई, दि. 20 (रा.नि.आ.) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते; तसेच पुनर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत. मात्र भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात 11, 18, 23 ते 29 एप्रिल 2019 अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत: एकाच वेळी मतदान होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई न लावता इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी, असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, 82 सरपंचांच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुका, विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील एकूण जागा व मतदारांची संख्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे हा बदल केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे श्री. सहारिया यांनी स्पष्ट केले.

       24 मार्च 2019 रोजी मतदान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था: नगरपरिषदा: पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा). जिल्हा परिषदा: पुणे- देहुगाव-लोहगाव निवडणूक विभाग (ता. हवेली). पंचायत समित्या: बागलाण (जि. नाशिक)- पठावे दिगर निर्वाचक गण आणि मोहाडी (जि. भंडारा)- वरठी व पालोरा.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :  ठाणे- 3,  रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4,नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार-5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद-3,  उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1,जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर-3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6,उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.