एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पहिल्या लोको पायलट सौमिता रॉय यांच्या कामगिरीवर आधारित देखाव्याचे उद्घाटन

Support Our Journalism Contribute Now

पुणे 5/9/2019 : स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी मंडळाने देखाव्याद्वारे घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. मी केलेल्या कामगिरीवर सादर केलेल्या देखाव्याने व सन्मानाने आज खूप छान वाटत आहे. या देखाव्यातून अनेक महिलांना आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. रेल्वे चालविणे सोपे काम नाही. मी जेव्हा सर्व महिला सहका-यांसोबत रेल्वे चालवत होते तेव्हा मला स्वत:लाच विश्वास बसत नव्हता, असे सांगत टेÑन चलाना आसान काम नही. इसमे मन की एकाग्रता जरुरी है. किसीभी महिलाको वो जो काम मनसे करना चाहती है उसपे डटे रहना चाहिए, उसे जरुर सफलता मिलेगी, असा महिलांना सल्ला देत कलकत्त्यातील पहिल्या महिला लोको पायलट सौमिता रॉय यांनी आपल्या भावना पुण्यात व्यक्त केल्या.

कर्वे रस्त्यावरील एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे कलकत्त्यातील पहिल्या महिला लोको पायलट सौमिता रॉय यांच्यावर आधारित देखाव्याच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, उल्हास शिंदे, अण्णा राऊत, राम बाटुंगे, दिनेश सुतार, उपाध्यक्ष महेश पुजारी, कार्याध्यक्ष विशाल तनपुरे, सौरभ लासुरे, प्रतिभा घारे, ममता डाबी, अनघा पोतनीस उपस्थित होते.

मंडळातर्फे दरवर्षी उत्सव गणेशाचा आदर्श स्त्री शक्तीचा उपक्रमांतर्गत भारतातील महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यावर आधारित देखावा सादर केला जातो. यंदा या उपक्रमाचे ९ वे वर्ष असून मंडळाचे ८० वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने कलकत्त्यातील पहिल्या महिला लोको पायलट सौमिता रॉय यांच्या कामगिरीवर आधारित देखाव्याचे सादरीकरण केले आहे. सौमिता रॉय यांनी सर्व महिला सहका-यांसमवेत सेलदा ते राणाघाट दरम्यान मैत्रीभूमी ही लोकल टेÑन चालवून एक विक्रम रचला आहे.

मोहन जोशी म्हणाले, महिला शक्तीचा जागर करण्यासाठी, महिलांमध्ये किती ताकद आहे हे दाखविण्यासाठी सातत्याने ९ वर्षे विविध देखावे मंडळातर्फे सादर केले जातात. तसेच ज्या महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देखावा सादर केला जातो त्या महिलांना या ठिकाणी बोलवले जाते, हे देखील स्तुत्य आहे.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, मंडळाने आगळावेगळा उपक्रम अबाधितपणे सुरु ठेवला आहे. महिला-पुरुष भेद न करता स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे. तसेच समाजाचे प्रबोधन होईल अशा देखाव्याचे सादरीकरण केले जात आहे. कितीतरी वर्षे रेल्वेमध्ये पुरुषांचीच आधी मक्तेदारी होती, अशावेळी सौमिता रॉय यांनी पहिल्या महिला लोको पायलट होण्याचा मान मिळविला आहे. अशा महिला या आधुनिक काळातील दुर्गा, काली आहेत.

प्रशांत वेलणकर म्हणाले, दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांविषयी देखावे सादर करून स्त्री शक्तीचा जागर केला जातो. त्या महिलांना येथे देखावा पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. या महिलांनी केलेले कार्य समाजातील सर्वांपर्यंत देखाव्याद्वारे पोहोचविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.