पश्चिम महाराष्ट्रात वीजग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी महावितरणकडून ग्राहकदिन व मेळाव्यांचे आयोजन

Share this News:

पुणे, दि. 21 जुलै 2019 : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात वीजग्राहक दिन व संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश प्रभारी पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी दिले आहेत.

महावितरणच्या या उपक्रमात ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत प्राप्त झालेल्या तक्रारी सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय महावितरणच्या विविध ग्राहकसेवा तसेच योजनांची माहिती देण्यात येणार आहे. बारामती परिमंडल अंर्तगत पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येईल. संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वतः ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील. मंगळवारी (दि. 23 जुलै) पासून या उपक्रमाला सुरवात होत आहे.

तसेच कोल्हापूर परिमंडल अंतर्गत दि. 23 जुलैला कोल्हापूर शहर, इचलकरंजी, सांगली, इस्लामपूर विभागातील सर्व उपविभाग, दि. 24 जुलैला कोल्हापूर ग्रामीण 1 व 2, सांगली शहर व विटा विभागातील सर्व उपविभाग आणि 25 जुलैला जयसिंगपूर, गडहिंग्लज व कवठे महांकाळ विभागातील सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये ग्राहक संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.