नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड – सुधीर मुनगंटीवार
Share this News:
मुंबई, दि. २१ : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीमध्ये या उपक्रमांतर्गत तीन ही घटकांमध्ये नदीकाठी जागांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे,अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर पीकपद्धती बदलून फळझाड लागवड घ्यावी यासाठी शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास देखील मदत होईल. सदगुरु जग्गी वासुदेव जे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत, त्यांच्या ‘रॅली फॉर रिव्हर’ कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ‘वाघाडी’ नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये खाजगी, शासकीय व वन जमिनीवर २०१९ मध्ये वृक्षरोपण, फळझाड लागवड, वनशेती कार्यक्रम हाती घेण्यात येणर आहे. याचधर्तीवर नद्या, उपनद्या, मोठे ओढे व नाले यांच्या दुतर्फा वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
वृक्ष लागवड संमेलन
राज्यातील उद्योजक, विकासक, व्यावसायिक, फिल्म इंडस्ट्रीतील लोक, वित्तीय संस्था, माध्यम क्षेत्रातील लोकांना ‘रॅली फॉर रिव्हर’ या कार्यक्रमात सामावून घेण्यासाठी राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली १७ सप्टेंबर २०१७ रोजी वृक्षलागवड संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, या सर्व घटकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आणि संमती दर्शविली आहे. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, सदगुरु जग्गी वासुदेव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.