ऐतिहासिक विंचुरकर वाड्यात काश्मीरी पंडित व मुलांनी केली मनोभावे पूजा 

Share this News:
 

पुणे 3/9/2019 : गणपती बाप्पा मोरया… भारत माता की जय… वंदे मातरम् अशा जयघोषात विंचुरकर वाडा परिसर दुमदुमून गेला. काश्मीरी पंडित व मुलांनी आरती करून गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. बाप्पाकडे कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊन विकासाला गती मिळावी अशी भावना येथील प्रत्येक विद्यार्थ्याने बाप्पाजवळ व्यक्त केली.

कसबा ते गणपतयार अंतर्गत पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंचातर्फे सरदार विंचूरकर वाडयात काश्मीरी पंडित व काश्मीरी मुलांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना व आरती या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पं. वसंतराव गाडगीळ, सरदार विंचुरकरांचे दहावे वंशज नारायणराव विंचुरकर, जनरल जोरावर सिंग यांचे वंशज देवेंद्र सिंग आणि दिक्षा कलुजिया, श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, हेमंत जाधव, पराग ठाकूर, सप्नील नाईक, समीर देसाई, राहुल कौल, सारंग गोसावी, सचिन गाडगीळ, राहुल भट, महेश करपे, मिलिंद एकबोटे, अनंत ताकवले उपस्थित होते.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, आपण सगळे आधीपासून भारतीयच आहोत नंतरही भारतीयच राहणार आहोत. आपण या विंचुरकर वाड्याला खूप मोठा इतिहास असून येथूनच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. इथे आपण सगळे उत्सव साजरा करतोय ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना काश्मीरला सुखी आणि विकसित झालेले पहायचे आहे.
पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, काश्मीर हे भारताचे मुकुट आहे. भारताच्या विद्या आणि कलेचे मूळ स्थान काश्मीर आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळे भारतीय एक आहेत. पूर्ण काश्मीर आपल्या ताब्यात येईपर्यंत आपण स्वस्थ बसून चालणार नाही. सरदार नारायणराव विंचुरकर म्हणाले, लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणपती विंचुरकर वाड्यात बसविला. आज आपल्या काश्मीरी बंधू-भगिनींनी येथे गणेशोत्सव साजरा केला याचा खूप आनंद आहे.
दिक्षा कलुरिया म्हणाल्या, जम्मू-काश्मिर आणि महाराष्ट्राच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जाऊया आणि देशाचा विकास करुया. इतर मान्यवरांनी देखील आपापली मनोगते व्यक्त केली.
आम्ही नेहमी पुण्यातील आमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर गणेशोत्सव साजरा करायचो.  पुढच्या वर्षी आम्ही काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करणार याचा खूप आनंद आहे. कलम ३७० रद्द झाल्यामुळे सरकारचे अभिनंदन. आता काश्मीरचा विकास होईल आणि काश्मीरी विद्यार्थ्यांना तिथेच नोकरी देखील मिळेल, अशी आशा आहे, अशा भावना काश्मीरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केल्या.