दीर्घकालीन उपाययोजना माझ्यासाठी महत्त्वाच्या – सिद्धार्थ शिरोळे
पुणे, दि. १४ ऑक्टोबर, २०१९ : घोले रस्ता आणि दीप बंगला चौकात वाहतूक कोडींच्या प्रश्नाने गेल्या काही वर्षांत गंभीर स्वरूप धारण केले होते. यामुळे या परिसरातील अपघातांमध्येही वाढ झाली होती. या दोन्ही परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करत, महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत तसेच परिसरातील नागरिकांशी चर्चा करत घोले रस्ता आणि दीप बंगला चौकात वर्तुळाकार वाहतूकव्यवस्था राबवण्यात आणि ती यशस्वी करून दाखवण्यात मला यश आले. तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना माझ्यासाठी महत्त्वाच्या असून हीच माझ्या कामाची पद्धत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.
एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील किंवा मतदारसंघातील नागरिक कोणती समस्या घेऊन आल्यावर त्या समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर माझा भर असेल, असेही ते या वेळी म्हणाले.
डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेली दोन वर्ष नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळताना अशा काही उपाययोजना करण्यात मी यशस्वी ठरलो याचे मला समाधान आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास माझ्या कार्यक्षेत्रात वाढ होणार असली, तरी समस्येच्या मुळाशी जात ठोस उपाय करण्यावर माझा नेहमी भर असेल,” असे सिद्धार्थ शिवाजीनगर परिसरातील मतदारांशी संवाद साधताना म्हणाले. शिवाजीनगर मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी मी निश्चित प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.