राजगडावरील महाराणी सईबाईंच्या समाधीचा जीर्णोद्धार करा – सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Share this News:

पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) – स्वराज्याची पहिली राजधानी, राजगडावर असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीची अत्यंत दुरवस्था झाली असून तिचा जीर्णोद्धार करावा. तसेच समाधीस्थळी त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुळे यांनी ही मागणी केली असून यापूर्वी २९ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांना पाठविलेल्या पत्राची आठवणही करून दिली आहे. या समाधीबारोबारच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे शिलेदार किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ल्यांची देखभाल दुरुस्ती आणि मढे घाटात नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरून शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल २५ वर्षे मराठी मुलुखावर राज्य केले. याच गडावर महाराणी सईबाई यांचे निधन झाले. स्वराज्याच्या पहिल्या महाराणी, छत्रपती संभाजी महाराजांच्या या मातोश्री सईबाई यांनी याच गडावर अखेरचा श्वास घेतला आणि तेथेच त्यांना भडाग्नी देण्यात आला. गडाच्या पद्मावती माचीवर पद्मावती मंदिर परिसरात असलेली सईबाईंची समाधी अत्यंत दुरवस्थेत असून वर्षानुवर्षे उन, वारा, पाऊस झेलत उघड्यावर उभी आहे. अक्षरश: एखादा चौथरा वाटावा, अशा या समाधीचा जीर्णोद्धार होऊन तिच्यावर छत्र बांधले जाण्याची नितांत गरज आहे. स्वराज्याची पहिली महाराणी ही अशी उन्हातान्हात, वाऱ्या-पावसात पाहून गडावर जाणारा प्रत्येक शिवप्रेमी हळहळत गडावरून खाली उतरतो.

 

त्यांच्यापैकी कित्येकांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटून, पत्रे पाठवून किंवा संपर्क साधून महाराणी सईबाईंच्या भग्न समाधीविषयी दु:ख व्यक्त केले आहे. अजूनही करत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच आपण पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून हा विषय कळविला होता. त्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करून लवकरात लवकर समाधीचा जीर्णोद्धार करावा आणि त्यांचा पुतळाही उभाराबा, अशी मागणी केली होती. तथापि अजूनही त्यावर सरकारने काहीही कार्यवाही केली नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे.

चौकट

*मढे घाटात तानाजी मालुसरे यांचा पुतळा उभारावा*
सिंहगडावर तानाजी मालुसरे यांनी देह ठेवल्यावर त्यांचे पार्थिव मढे घाट मार्गे कोकणातील त्यांचे मूळ गाव उमरठे येथे नेण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि शिवप्रेमींच्या मनात या इतिहासाची आठवण कायमस्वरूपी जागृत रहावी, यासाठी मढे घाटात तानाजी मालुसरे यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.