कोरेगाव भीमा, मराठा आरक्षण आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे
मुंबई, दि. 27, 2020 : राज्यातील कोरेगाव-भीमा, मराठा आरक्षण आणि नाणार प्रकल्प आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरूणांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. कोरेगाव भीमा आंदोलनातील 649 पैकी 348 गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली. दरम्यान, गेल्या 5 वर्षात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जी शेतकरी आंदोलने झालीत, त्या आंदोलनातील गुन्हेही मागे घेणार असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे, अशोक उर्फ भाई जगताप आदी सदस्यांनी कोरेगाव भीमा येथे आंदोलन करणाऱ्यांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात आज तारांकित प्रश्न विचारला होता, या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री श्री. देशमुख यांनी कोरेगाव-भीमाप्रकरणी दाखल 649 पैकी 348 गुन्हे मागे घेतल्याचे सभागृहाला सांगितले. त्याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले असून उर्वरित 88 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय नाणार प्रकल्प आंदोलनातील दाखल 5 गुन्ह्यांपैकी 3 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचे सांगून विविध सामाजिक आंदोलनातील निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची ग्वाही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यांवेळी दिली.
कोरेगाव भीमा, शहरी नक्षलवादाच्या संदर्भात विविध शिष्टमंडळांनी भेटी घेऊन निवेदने दिली, या प्रकरणांची चौकशी जर चुकीच्या दिशेने झाली असेल किंवा निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना यात अडकवले असेल तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम, चौकशी आयोग अथवा अन्य बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असेही गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरेगाव भीमा आणि एल्गार प्रकरणाची चौकशी शासनाने सुरू केली होती, माजी केंद्रीयमंत्री खा. शरद पवार यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिला. राज्य शासनाला विश्वासात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायला हवा होता असेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.