मुंबई, दि. 30/7/2019 : महाराष्ट्र पोलिसांची देशात चांगली प्रतिमा आहे. ही प्रतिमा अधिक उंचाविण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी. यासाठी शासन पोलीस विभागाच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. गत पाच वर्षातील महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट अशीच राहीली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्याचे पोलीस दल हे मोठी क्षमता असलेले देशातील एकमेव असे आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता, या दलाने आपल्या सतर्कतेमुळे आणि सजगतेतून अनेक अप्रिय घटना टाळण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. संवाद साधून अनेक गोष्टी साध्य करता येतात हे सिद्ध केले आहे. आता कायदा आणि सुव्यवस्था राखायची आणि सेवा द्यायचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यामुळे शासक नव्हे तर सेवक म्हणून काम करावे लागेल. हा बदल स्विकारून लोकाभिमुखता वाढवावी लागेल. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधूनच अनेक गोष्टी साध्य करता येतात, हे ध्यानात घ्यावे लागेल. आपल्या सोबतच्या आणि हाताखाली काम करणाऱ्यांना आपल्या वागण्यातून आणि सुसंवादातून चांगल्या कामांसाठी प्रवृत्त करावे लागेल. गत पाच वर्षात पोलिसांच्या अधिकारांचे मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरण केले. या अधिकाराबरोबरच मोठी जबाबदारी येते. याचे भान ठेवून योग्य वापर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढते आहे. पण किरकोळ गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्याची कार्यपद्धती निर्माण करावी लागेल. यामुळे सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्माण करता येईल. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीच तंत्रज्ञानाचा आग्रह धरला जातो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता येते आणि विश्वासार्हता वाढीस लागते.
आगामी काळातील सण, उत्सवात आणि तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे काही अनिष्ट घटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यावर जरब बसविण्यात यावी. सण, उत्सव शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा, लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, पोलिसांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. विपरीत परिस्थितीत आणि आव्हानांना तोंड देत काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठिशी शासन पूर्ण ताकदीने उभे आहे. त्यामुळे या दलाच्या सुधारणाच्या आणि कल्याणाच्या प्रस्तावांवर तत्काळ आणि सकारात्मक निर्णय वेळोवेळी घेण्यात आले आहेत. त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे.
अंमली पदार्थांविरोधात झीरो टॉलरन्स..
परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलिसांना अंमली पदार्थाविरोधात गांभीर्याने कारवाई करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, अंमली पदार्थांमुळे भावी पिढ्या बरबाद होऊ शकतात. याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दहशतवाद, नक्षलवादाच्या विरोधात जितक्या तीव्रतेने कारवाई करण्यात येते तितक्याच पद्धतीने कारवाई करावी लागेल. अंमली पदार्था विरोधात झीरो टॉलरन्स भूमिकेतून कारवाई व्हावी. त्यासाठी गरज असल्यास आणखी प्रभावी धोरण आखण्यात यावे आणि कारवाईसाठी यंत्रणा उभी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.गृह राज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले, ‘पोलीस दलासाठी निधीची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांत आर्थिक अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. पोलिसांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून आधुनिकीकरणासाठी साधनसामग्री उपलब्ध होईल, अशी तरतूद केली आहे. राज्यातील सामाजिक सलोखा वृध्दिंगत करण्यात पोलीस मोठी भूमिका बजावू शकतात. राज्याला प्रागतिक आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारे असे मुख्यमंत्री मिळाले आहेत, याचा पोलिस दलाने लाभ घेणे आवश्यक आहे.’
गृह राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, ‘पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांसह मनुष्य बळाच्या व्यावसायिक सक्षमीकरणासाठी पुरेसे प्रयत्न करण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शकता आणण्यावर मुख्यमंत्री महोदयांनी भर दिला आहे. गुन्हे सिद्धींचे प्रमाण वाढावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: जिल्हास्तरापर्यंत नियोजन केले आहे. यासाठी विधीतज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. त्यांनी या दलाला अमूलाग्र अशी बदलाची दिशा दिली आहे.’
मुख्य सचिव श्री. मेहता आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. संजय कुमार यांनी पोलीस दलाच्या कामांबाबत कौतुकोद्गार काढतानाच दलातील सुधारणांचा आवर्जून उल्लेख केला.
सुरुवातीला पोलीस महासंचालक श्री. जयस्वाल यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला.
यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी सण, उत्सव तसेच निवडणूक आदींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती देण्यात आली.
या दोन दिवसीय परिषदेत विविध क्षेत्रातील प्रेरक मार्गदर्शकांसह पोलिसिंगच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्य पद्धतीबाबत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.