महाराष्ट्र : एक हजार गावे आदर्श करण्यासाठी अभियान
मुंबई दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १००० गावे आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरूवात केली आहे. अभियानांतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या कृती संगमातून ग्रामपंचायतींमध्ये सामाजिक व मुलभुत सोई सुविधांना चालना देण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. आदर्श ग्राम निर्माण करताना ग्रामपंचायती सामाजिक व आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामविकासाचे चॅम्पियन्स म्हणून कार्य करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील २५ जिल्हयातील सरपंच व ग्रामसेवक यांची प्रशिक्षणाव्दारे क्षमता बांधणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मानवी निर्देशांक कमी असलेल्या २५ जिल्ह्रयातील एकुण १००० गावांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये तांत्रिक मार्गदर्शनासाठी व पायाभुत सुविधा निर्माण करण्याठी ३६० ग्राम परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आाहे. हे ग्राम परिवर्तक प्रशासन आणि ग्रामपंचायत यांचा दुवा म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामपंचायतींला मिळवून देण्यासाठी ग्राम परिवर्तकांमार्फत गाव विकास आराखडा तयार करण्यात येतो. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या गरजा ओळखून ग्राम सभेच्या माध्यमातून कामे प्रस्तावित करण्यात येतात. यामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांची महत्वाची भुमिका आहे. हे ओळखून शासनाने ४०० सरपंच व ग्रामसेवक यांना अधिक सक्षम करण्याचे धोरण आखले आहे.
महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायती म्हणून पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार जि. अहमदनगर, अण्णा हजारे यांच्या राळेगण सिध्दी, भास्करराव पेरे यांच्या पाटोदा जि. औरंगाबाद अशा ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून उत्कृष्ट काम करून इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श निर्माण केला आहे. अशा आदर्श ग्रामपंचायतींची प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनात निवड गावांतील सरपंच व ग्राम सेवकांनी आपल्या ग्राम पंचायतीमध्ये कार्य करावे व आदर्श ग्राम निर्माण करावे, ही अपेक्षा आहे. त्यासाठी एक प्रशिक्षणाचे मॉडयूल तयार करण्यात आले असून, त्याव्दारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यशदाचे राज्यातील अमरावती, नागपूर, जळगाव, औरंगाबाद व बारामती येथे विभागीय प्रशिक्षण केंद्रे आहे. त्याव्दारे २५ जिल्हयातील सरपंच व ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामध्ये संबंधित जिल्हयातील ग्राम परिवर्तक, जिल्हा कार्यकारी व व्हिएसटीएफचे नोडल अधिकारीसुध्दा सहभागी झाले आहेत.
सदर प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायती आर्थिक दृष्टया सक्षम करणे, शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग मिळविणे, ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करणे, ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय इमारती, देखभाल व दुरूस्ती, गाव विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना गती देणे अशा काही महत्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, सरपंच व ग्रामसेवकांनी आदर्श ग्राम निर्मितीवर लक्ष्य केंद्रीत करून ठराविक वेळेत गाव विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यावर भर द्यायचा आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श सरपंच व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्याचेही धोरण अभियानामार्फत आखण्यात येत आहे.