मैत्रेय फायनान्स कंपनीच्या गुंतवणुकदारांना ठेवी परत करण्यासाठी प्रयत्नशील – दीपक केसरकर
मुंबई, दि. 27 : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनी या फायनान्स कंपनीच्या गैरव्यवहाराची राज्य शासनामार्फत चौकशी सुरू असून योग्य ती कायदेशीर पावले उचलली जात आहेत. यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणुकदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे सांगितले.
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा व या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा आज गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी रोहयो, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार अनिल बाबर, आमदार किशोर पाटील यांच्यासह गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मैत्रेय ग्रुपद्वारे फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने एकत्र केली असून यासंबंधी 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जप्त मालमत्तेची विल्हेवाट करण्यासाठी स्वतंत्र सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्था) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमान्वये कंपनीच्या मालकीच्या एकूण 346 मालमत्ता व 17 जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांची विक्री करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यानंतर ठेवीदारांना त्यांची रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी ठेवीदारांना आश्वस्त केले.
ज्या ठेवीदारांनी अद्याप फसवणुकीची तक्रार दाखल केली नाही, त्यांनी लवकरात लवकर संबंधित जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधून ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन श्री. केसरकर यांनी यावेळी केले.