Milk production increase by 6-7 litres per day with local fodders

Support Our Journalism Contribute Now

स्थानिक चाऱ्यावर लक्ष केंद्रित करत जेबीजीव्हीएसने दिले ७,४०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण
परिणामतः संकरीत तसेच गीर जातीच्या गायींच्या रोजच्या सरासरी दुघ उत्पादनात वाढ

पुणे: २६ मे: असे म्हटले जाते की जसे पेराल तसे उगवते. गुरांनाही हे लागू होते आणि त्यांचे आरोग्य, उत्पादकता व गोपालनाच्या खर्चातही त्यामुळे सकारात्मक फरक पडतो. बजाज समूहाने स्थापन केलेली जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था (जेबीजीव्हीएस) शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करते ज्यामध्ये चाऱ्याबद्दल शास्त्रीय मार्गदर्शन केले जाते. संस्थेच्या कामधेनु गोपालन प्रकल्पांतर्गत पुणे, औरंगाबाद व वर्धा जिल्ह्यातील संकरीत, गीर व गवळाऊ गायींच्या लाभार्थींसाठी हे उपक्रम केले जातात. आत्तापर्यंत जेबीजीव्हीएसने ३३६ कार्यक्रमांतून ७,४०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून संकरीत व गीर अशा दोन्ही प्रकारच्या गायींचे रोजचे सरासरी दुध उत्पादन गेल्या दोन वर्षांत ५-६ लिटरने वाढले आहे.

स्थानिक व घरगुती चाऱ्यावर भर
निवडलेल्या लाभार्थींसाठी बंधनकारक व इतर शेतकऱ्यांसाठी खुल्या असणाऱ्या प्रशिक्षणांत इतर मुद्द्यांसोबतच घरगुती व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या चाऱ्यावर भर देण्यात येतो. खुराकाचा बहुतांश भाग जर स्वतःच्या शेतातील चारा, कडबा किंवा काड यांपैकी असेल तर शेतकऱ्याला कमी खर्च व रसायन विरहित पशुखाद्य असा दुहेरी लाभ होतो. कधीकधी बाहेरील संतुलित सेंद्रिय पशुखाद्य द्यायला हरकत नाही. प्रशिक्षणांत पारंपारिक पशुखाद्य निर्मितीत सुधार करणे, तसेच काही नवीन पद्धतींचा समावेश असतो. याबद्दल अधिक माहिती देताना जेबीजीचीएसचे सचिव श्री व्ही बी सोहोनी म्हणाले, “मानवाप्रमाणेच जनावरांनाही योग्य पोषण व चौरस आहाराची गरज असते. योग्य प्रमाणात हिरवा चारा, वाळलेला चारा व आंबोण जे सर्व मिळून प्रतिदिन २५-३० किलो होईल आणि पुरेसे पाणी जर उपलब्ध असेल तर चांगले उत्पादन मिळते.”

अलीकडेच औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात आयोजित केलेल्या एका प्रशिक्षणात तज्ञांनी ज्वारीचा कडबा, बाजरीचा सरमाड, गव्हाचे काड व उसाचे वाड यांसारख्या स्थानिक पशुखाद्यावर लक्ष केंद्रित केले. त्याचप्रमाणे या वाळलेल्या चाऱ्याला भरडून व योग्य प्रक्रिया करून पोषक पशुखाद्य निर्मितीची माहितीही देण्यात आली. गव्हाच्या काडात गुळ व मीठ घालण्यात येते. जेबीजीव्हीएसचे औरंगाबादचे पशुधन कार्यकर्ता/सल्लागार श्री एस बी काळे सांगतात, “बाजारात उपलब्ध असलेल्या पेंडी अनेक वेळा रसायन युक्त असतात व त्यांच्या किमतीही आभाळाला भिडत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले व स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेले पशुखाद्य वापरल्यास शेतकऱ्यांच्या नफ्यात शाश्वत वाढ होऊ शकते.”

शिवाय जिथे हिरवा चार नैसर्गिक रित्या उपलब्ध नाही तेथील शेतकऱ्यांना तो निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण जेबीजीव्हीएस तर्फे दिले जाते. यामध्ये हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उगवणे, अझोला प्रकारच्या पाणवनस्पतींचा वापर व उपलब्ध मोकळ्या जमिनीवर नैसर्गिक चारा लागवड यांचा समावेश असतो.

जेबीजीव्हीएस पशुखाद्य तक्ता
अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित एक नमुना पशुखाद्य तक्ता (खालील प्रमाणे) जेबीजीव्हीएसने बनवला आहे, जो संकरीत व गीर अशा दोन्ही प्रकारच्या गायींसाठी उपयुक्त आहे. गीर गायींना संकरीत पेक्षा थोडा कमी आहार पुरतो. चारा किती लागतो हे मुख्यत्वे गायीच्या वजनावर अवलंबून आहे. वरील तिन्हीपैकी गवळाऊ जातीच्या गायींना सर्वात कमी चारा पुरतो. या काटक जातीच्या गायींना रोज साधारण २५ किलो चारा व १५-२० लिटर पाणी पुरते. कोणत्या प्रकारचा व किती चारा दिला जातो हे गायीच्या दुध देण्याच्या क्षमतेवरही अवलंबून आहे. एखादी गाय आठ लिटर पेक्षा कमी दुध देत असेल तर बाहेरील संतुलित पशुखाद्य दिले जात नाही.

खाद्याचा प्रकार खाद्याचा तपशील रोजची गरज
पाणी ऋतू नुसार ८०-१०० लिटर
हिरवा चारा मका, विशिष्ठ गवत व पाने १५-२० किलो
वाळलेला चारा कडबा, सरमाड, वाड, काड ६-८ किलो
पौष्टिक खाद्य गहू/शेंगदाणा/सरकीचे आंबोण किंवा बाहेरील संतुलित खाद्य ४-५ किलो

उत्पादक क्षमतेवरील परिणाम
जेबीजीव्हीएसच्या पशुधन कार्यकर्त्यांच्या निरीक्षणानुसार प्रशिक्षण, प्रात्याक्षिके व कामधेनु गोपालन प्रकल्पांतर्गत केलेल्या अन्य मदतीच्या आधारे गायींची उत्पादकता सुधारत आहे. उदाहरणार्थ पुण्याच्या मावळ तालुक्यात रोज प्रत्येकी १२-१५ लिटर दुध देणाऱ्या दोन संकरीत गायी असलेल्या एका शेतकऱ्याला दोन वर्षांपूर्वी आणखी एक गाय, पशुखाद्य प्रशिक्षण आणि आधुनिक गोठा व बायो-गॅस संयंत्र बसवण्यासाठी मदत देण्यात आली. सुधारित घरगुती पशुखाद्य व बायो-गॅसचे प्रवाही मिश्रण वापरून वाढवलेल्या शेतातील वाळलेला चारा वापरून सदर शेतकऱ्याने शाश्वत पद्धतीने गोपालन करून आणखी गायी विकत घेतल्या. आजच्या घडीला त्याच्याकडे २३ दुधाळ गायी असून रोज एकूण ४०० लिटर दुध मिळते. अशाप्रकारे प्रत्येक गायीपासून मिळणारे दुध आता वाढून रोज १७ लिटर पर्यंत पोहोचले आहे. हे सर्व संकरीत गायींसाठी प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात घडले आहे.

दोन वर्षांत प्रशिक्षण व अन्य सहाय्याच्या मदतीने दुधाचे उत्पादन वाढल्याची पुणे जिल्ह्यात अन्य उदाहरणेही आहेत. एका गीर गायीचे दुध उत्पादन ८ लिटर हून १४ लिटर झाले, एका संकरीत गायीचे १० हून १४ लिटर झाले, तर अन्य एका संकरीत गायीचे १० हून १७ लिटर झाले. अशा प्रकारे सामान्य परिस्थितीत रोजचे सरासरी दुध उत्पादन ५-६ लिटरने वाढल्याचे दिसते. घरगुती पौष्टिक आहार देऊन एका कुपोषित संकरीत गायीचे रोजचे दुध उत्पादन ७ हून अपवादात्मक रित्या २७ लिटर पर्यंत वाढवण्यात एका शेतकऱ्याला यश आले. त्याच प्रमाणे, विदर्भ विभागातील तीव्र उन्हाळ्यात योग्य आहाराच्या अभावे मृत होणाऱ्या गवळाऊ गायींचे प्रमाणही संस्था कार्यरत असलेल्या गावांत कमी झाले आहे. लाभार्थींनी वरील प्रकारे खाद्य पुरवण्यास सुरवात केल्यावर हा परिणाम दिसून आला.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.