एक हात मदतीचा’ उपक्रम : पूरग्रस्तांसाठी आमदार लांडगे यांनी जपली ‘माणुसकी’!

Share this News:

9/8/2019, पिंपरी।

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात येईल.

महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन, अविरत श्रमदान, सांकोसा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच आदी सामाजिक संस्था संघटनांनी याकामी सहकार्य केले आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. त्याद्वारे पन्नास वाहनांमध्ये बसेल एवढे अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनोपयोगी साहित्य कोल्हापूर, सांगली तसेच कराड भागातील पुरग्रस्तांना दिले जाणार आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पवसाने पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. आजही परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्यामुळे शासकीय यंत्रणा अपुरी ठरत आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रशासनाकडून काम सुरू आहे. जे पुरातून सुरक्षितपणे बाहेर आले आहेत, त्यांना जीवनावश्यक वस्तुंची गरज भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून पुरग्रस्त नागरिकांना जीवनाश्यक वस्तुंची मदत केली जाणार आहे. त्यासाठी १५० कार्यकर्त्यांची टीम अन्नधान्, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे आदी वस्तुंची जुळवाजुळव केली आहे, अशी माहिती सुनील पवार यांनी दिली.

नागरिकांना मदतीसाठी आवाहन…

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना सध्या मदतीची गरज आहे. त्यांचे काही नातेवाईक, मित्र परिवार पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरात वास्तव्यास आहेत. अनेकांना गावाकडील लोकांना कशी मदत करावी याची चिंता आहे. अशा नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सामाजिक बांधिलकीतून मदत देण्यासाठी संदीप ठाणेकर : ९७६५६४९७९७, डॉ. निलेश लोंढे : ९८८ १५७२३९५, दिगंबर जोशी : ९०११०१२९७४, जितेंद्र माळी : ९८९०९२६९९७ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आर्थिक स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही. आर्थिक मदत करायची असेल, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी येथे करावी, असे आवाहन केले आहे.

एनडीआरएफ’ प्रशिक्षित पथक सांगलीकडे रवाना…

आपत्ती व्यवस्थापन फेडरेशन, पुणे आणि आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस फाउंडेशनच्या माध्यमातून ‘एनडीआरएफ’ प्रशिक्षण प्रशिक्षित पथक सांगलीतील पूरग्रस्त गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी रवाना झाले आहे. एकूण २५ जणांचे पथक असून, अध्ययावत बोट, रबर बोट, लाईफ जाकेट, जेवनाचे साहित्य यासह आवश्यक साहित्य घेवून संबंधित टीम सांगलीकडे रवाना झाली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता आमदार महेश लांडगे यांनी केली आहे, अशी माहिती संतोष शेलार यांनी दिली.