मराठीच्या उत्कर्षासाठी शासनाबरोबरच समाजाचेही योगदान आवश्यक – विनोद तावडे

Share this News:

मुंबई, दि. 1 : मराठी भाषा विभागाच्या उत्कर्षासाठी शासन स्तरावर काम सुरू आहेत. यासाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शासनाबरोबरच मराठीच्या उत्कर्षासाठी समाजाचेही योगदान आवश्यक असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

विधानपरिषदेत मराठी भाषेवरील अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. श्री. तावडे म्हणाले की,  मराठी भाषा  विभाग हा २००९ ला सुरू करण्यात आला आहे. मराठी भाषा विभागाचा पहिला स्वतंत्र मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. मराठीच्या उत्कर्षासाठी शासनाचे काम सुरू आहे. मराठी भाषेत वैविध्य पहायला मिळते. मराठीत सुमारे ६० बोलीभाषा आहेत. राज्यात वेगवेगळ्या भागात या भाषांचा वापर केला जात असल्याचे पहायला मिळते. मराठी ही भाषा काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली भाषा आहे. आतापर्यंत चार मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे  हे त्याचेच द्योतक आहे. मराठी भाषेला एका चैाकटीत न बांधता सर्वांगीण विकास होण्याची गरज असल्याचे श्री. तावडे म्हणाले.

वाचन प्रेरणा दिवस हा एक महत्वाचा दिवस असून या दिवशी प्रत्येक आमदाराने मराठी भाषेचे महत्व ओळखून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज आहे. मराठी भाषा विभागमार्फत नवोदित साहित्यिकांसांठी राज्यभरात कार्यशाळा घेतल्या. राज्यभरात या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला. विश्वकोषाचे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला ५० लाख रुपये दिले जाते. मात्र, केवळ या संमेलनालाच नव्हे तर राज्यातील इतरही विविध ३५ साहित्य संमेलनाला शासन अनुदान दिले जाते. नवीन, साहित्यिक, कलालेखक निर्माण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तंजावर येथील विद्यापीठात मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच अलीकडेच तेल अवीव येथे मुंबई विद्यापीठाने मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी करार केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासोबतच मराठी भाषा भवन उभारणीसाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. देशातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे आपल्या राज्यात आहे. मातृभाषेतून शिक्षणाची चळवळ ही जगात सुरू झाली आहे. राज्यात ही चळवळ मातृभाषेसाठी सुरू होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे श्री. तावडे पुढे म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, कपील पाटील, जयंत पाटील, विलास पोतनीस, दत्ता सावंत, बाळाराम पाटील भाई गिरकर यांनी भाग घेतला.