Organise Awas Yojana week all over country – CREDAI to PMO
देशभरात आवास योजना सप्ताह साजरा करावा
क्रेडाई महाराष्ट्राचे पंतप्रधान कार्यालयास विनंती पत्र
पुणे ता. २५: ‘सबका साथ, सबका विकास’याप्रमाणे २०२२ पर्यंत ‘सबको निवास’ हे ध्येयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. या ध्येयपूर्तीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने सक्रीय पुढाकार घेतला असून या योजनेच्या जनजागृतीसाठी देशभरात ‘प्रधानमंत्री आवास योजना सप्ताह’ साजरा करावा, अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान कार्यालयास त्यांनी सुपूर्त केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाईने याआधी केंद्र व राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. परंतु, या महत्वाकांक्षी योजनेच्या पूर्ततेसाठी विकसक आणि नागरिक यांच्यात जनजागृती होणे आवश्यक आहे. या उद्देश समोर ठेऊन क्रेडाईने जागतिक पर्यावरण दिनापासून (५ जूनपासून) पुढील आठवडा ‘प्रधानमंत्री आवास योजना सप्ताह’ म्हणून देशभरात साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला आहे.
ते पुढे म्हणाले की, अतिशय व्यापक दृष्टिकोनातून आम्ही या सप्ताहाकडे बघत असून परवडणारी घरांच्या निर्मितीसाठी विकसकांना प्रोत्साहित करणे हा आमचा प्रमुख हेतू आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस देखील आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण रचनांची निर्मिती करणारे वास्तू विशारद तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किफायतशीर प्रकल्प साकारणारे बांधकाम व्यावसायिक यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करणे, प्रसार माध्यमाच्या साहाय्याने सप्ताहाविषयी जनजागृती करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रदर्शन भरविणे, विकसक,तंत्रज्ञ यांच्यात उत्साह प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा घेणे, आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या शहरास अथवा राज्यास उत्कृष्ठ कामगिरीचा पुरस्कार देणे आदी नावीन्यपूर्ण उपक्रम आपण राबवू शकतो, ज्यायोगे परडवणाऱ्या घरांचे स्वप्न आपण संयुक्तिक प्रयत्नातून अल्पावधीत पूर्ण करू शकतो, असे आम्ही पत्रात नमूद केले असल्याचेही शांतिलाल कटारिया यांनी सांगितले आहे.