महाराष्ट्र – आणीबाणीच्या काळातील बंदीजनांना सन्मानपत्र देणार
मुंबई, दि. 25 : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत बंदीजन असलेल्यांना पाच हजार तर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना १० हजार मानधन देण्यात येते. आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य अजित पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आतापर्यंत ३२६७ जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगावा लागला आहे. ते आज विविध ठिकाणी आहेत त्यांची शपथपत्रे घेण्यात येतात मात्र, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय ते मंजूर करण्यात येत नसल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
तसेच संबंधित कामकाज कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिका-यांना निर्देश देण्यात येतील. भविष्यात हा निधी वाढविण्यासाठी विचार करण्यात येईल. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम संबंधित सर्व सैनिकांना मानधन प्रदान करण्यात येते. या सैनिकांना आणि आणीबाणीत बंदीवास भोगलेल्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी सदस्य सर्वश्री पराग अळवणी, सुभाष पाटील, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.