पुणे: ‘मामाच्या गावची सफर’ अंतर्गत मामांनी ३५० वंचित-विशेष ‘भाचे मंडळींना’ पाठविला खाऊ आणि धान्य
पुणे, एप्रिल २९, २०२० : मोबाईल, टिव्ही आणि संगणकाच्या विश्वात वंचित विशेष चिमुकल्यांना मामाच्या गावाची मजा अनुभविता यावी, याकरीता मामाच्या गावची सफर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट च्यावतीने दरवर्षी करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ३५० वंचित-विशेष मुलांना येथे येऊन या सफरीचा आनंद घेता येणे शक्य नसल्याने त्यांना सर्व प्रकारचे धान्य आणि तब्बल २० प्रकारचा खाऊ, फळे त्यांना त्यांच्या संस्थेत मामांकडून पाठविण्यात आले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेवा मित्र मंडळ गणपती मंदिरात हे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंडळाचे शिरीष मोहिते, आनंद सराफ, डॉ.मिलिंद भोई, राजाभाऊ कदम आदी उपस्थित होते. आपलं घरं, माहेर, एकलव्य न्यास, लुई ब्रेल अंध अपंग संस्था, संतुलन पाषाण, बचपन वर्ल्ड फोरम, सेवाधाम वृद्धाश्रम आदी संस्थातील मुले सहभागी झाले आहेत. उपक्रमाचे यंदा २१ वे वर्ष आहे.
शिरीष मोहिते म्हणाले, दरवर्षी हास्य विनोद करणारा चार्ली, विदूषक, उंट, घोडे आणि बॅन्ड-बाजाच्या स्वरात मामाच्या गावी चिमुकल्या भाचे मंडळांचे जंगी स्वागत करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे वंचित मुलांना येथे येणे शक्य झाले नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पाच प्रकारची कडधान्य, साखर, पोहे, मसाले प्रकारचे धान्य, लोणचे, कोकम सरबत, भेळ, केक, खारी, टोस्ट, बटर, बिस्कीट, चॉकलेट, १०० लीटर आमरस, कलिंगड, खरबूज प्रकारची फळे, बेसन लाडू, चिवडा आदी खाऊ व साहित्य पाठवित आहोत.
दरवर्षी या मुलांसाठी विविध स्पर्धा, सहली, आर्केस्ट्रा, पोलीस स्टेशनची सफर, अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन येत होते. यंदा केवळ खाऊ व आवश्यक धान्य पाठविण्यात आले. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अॅड.नितीन झंझाड, उमेश कांबळे, गणेश सांगळे, अमर लांडे, सचिन ससाणे, कुणाल जाधव, अमेय थोपटे, अमित देशपांडे, विक्रांत मोहिते, प्रद्युम्न पंडित यांनी आयोजनात सहभाग घेतला.