पूरग्रस्तांसाठी विश्वास पाठक यांच्याकडून 5 लाखांची मदत मुख्यमंत्री निधीत दिले योगदान

Share this News:

मुंबई/नागपूर, 14 ऑगस्ट

 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली परिसरात गेल्या आठवड्यापासून आलेल्या महापुराने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष या भागाकडे लागले असून राज्याच्या अनेक सामाजिक संस्थांनी, व्यक्तींनी ठिकाणांहून मदतीचा हात पुढे करून मनाचे औदार्य दाखविले आहे. अशाच स्थितीत खारीचा वाटा म्हणून का होईना मराविमं सुत्रधारी कंपनीचे संचालक व भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनीही पूरग्रस्तांसाठी आपला मदतीचा हात पुढे करून 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सहायता निधीला ही रक्कम पाठक यांनी दिली.

 

राज्य शासनातर्फे मदतीचे काम सुरुच आहे. आभाळाएवढ्या नैसर्गिक संकटात फक्त शासनाने मदत करून चालणार नाही, तर सामाजिक जाणीवेचे भान ठेवून पाठक यांनी ही मदत केली व मोठ्या मनाचा परिचय दिला. या नैसर्गिक संकटात सर्वजण धावून गेले तरच अशा संकटांचा सामना करणे शक्य होईल आणि संकटातील लोकांना हिंमत येईल, अशा भावना पाठक यांनी व्यक्त केल्या. या संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी असाच मोठ्या मनाचा परिचय समाजातील अनेकांनी दाखविला असला तरी अशा प्रसंगी कितीही मदत मिळाली तरी ती कमीच असते, हे लक्षात घेऊन ज्यांना शक्य आहे, त्यांनी मुख्यमंत्री निधीला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही पाठक यांनी केले आहे.