कोरोना संकटात मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी ससूनची समुपदेशन हेल्पलाईन

Share this News:

पुणे,दि.१५: सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागामार्फत “मन संवाद” नावाची सायकॉलॉजिकल हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइन चा क्रमांक 020-26127331 असा असून ही हेल्पलाइन दररोज 24 तास सुरू आहे, अशी माहिती बी.जे .महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.

सर्वसामान्य नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी इत्यादी लोक या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या हेल्पलाइन वर सध्या दररोज पंधरा ते वीस लोक फोन करत आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर व नर्सेस यांचे प्रमाण लक्षणीय (35%) आहे. कोरोना विषाणूची भीती, सद्यस्थितीतील व भविष्यातील अनिश्चितता, सध्याची लॉकडाऊन परिस्थिती, वेगाने होणाऱ्या घडामोडी इत्यादी गोष्टींचा परिणाम सर्वांच्यात मानसिक स्वास्थ्यावर पडत आहे. या कठीण प्रसंगाला तोंड कशा प्रकारे द्यावे, आपले तसेच कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य कशाप्रकारे सांभाळावे याचे समुपदेशन या हेल्पलाईन द्वारे केले जाते. हेल्पलाइनसाठी मानसिक आरोग्य क्षेत्रातील मनोविकृती तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, मनो सामाजिक कार्यकर्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कोरोना विषयक शंका , समाधानासाठी टोल फ्री हेल्पलाईन

कोरोना विषयक शंका, समाधानासाठी 18002334120 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.