उगवत्या पिढीने उजळली रिक्षाचालकांची प्रतिमा, सवाईत उदयाला आला माणुसकीच्या सहप्रवासाचा पुणे पॅटर्न

Share this News:

पुणे दि. १६- जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हे पुण्याचे वैशिष्ट आहे. तसेच रिक्षा चालकांच्या वाट्याला कौतुकपेक्षा टीका जास्त आली तरी रिक्षा शिवाय पुण्याचे पान हालत नाही. सवाई व रिक्षा दोन्हींनी पुणेकरांची ६०हुन जास्त वर्षे सोबत केली आहे.

 

काल समारोप झालेल्या ६७ व्या सवाईत पुण्याची ही दोन्ही वैशिष्ठय एकत्र आली . एकाने रसिकांना अदभूत श्रवणानंद दिला. तर दुसर्याने त्या आनंदावर विरजण न पाडता उत्सवाची मैफील संपल्यावर रात्री घरापर्यंतचा प्रवास सुलभ केला. तेही रिक्षा चालकांच्या प्रवासी भाड्याला नकार देण्याच्या कथित प्रतिमेला छेद देत आणि अधिकृत मिटर भाड्यात .

 

अशा एक नव्हे, दोन नव्हे हजारो रसिकांना हा सुखद अनुभव मिळाला. आणि तो देण्यात रिक्षाचालकांच्या उगवत्या पिढीने सूत्रधाराची भूमिका बजावली. ती यशस्वी करण्यात स्वतःच्या वाहनांतून उत्सवाला आलेल्या पुणेकरांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्याचा हात दिला.आणि यातून माणुसकीच्या सहप्रवासाचाआणखी एक पुणे पॅटर्न उदयाला आला.

 

मागिल वर्षांपासून सवाईचा उत्सव महाराष्ट्र मंडळाच्या मुकुंद नगर येथील मैदानात स्थलांतरित झाला. पण मैफिल संपल्यावर घरी जाताना रसिकांना रिक्षा मिळण्यास अनेक अडचणी आल्या होत्या . त्यावर या वर्षी काय उपाय करता येईल अशी विचारणा उत्सवाच्या संयोजकांनी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांना केली.पंचायतीने त्याला प्रतिसाद देत रसिकांना घरी परतायला अडचण येऊ न देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचा शब्द दिला.

 

रात्री उशिरा प्रवासी-रसिकाला सोडल्यावर परतीचे भाडे कसे मिळणार ? हा रिक्षाचालकांसमोरचा यक्ष प्रश्न कसा सोडवायचा हे आव्हान होते. मग रिक्षाचालकाचे घर व प्रवाश्याच्या जाण्याचे ठिकाण याचा सांधा जुळवण्याचा निर्णय झाला. इथे सिटी ग्लाईड ऑटो ही रिक्षा ऍप कंपनीचे सहायय मिळाले. या कंपनीचा कार्यकारी अधिकारी राहुल शितोळे हा तरुण, एका रिक्षा चालकांचा मुलगा आहे. इतकेच न्हवे तर त्याने कंपनीचे धोरण म्हणून आपले सहकारी संजय पोळ,आकाश गुप्ता, रोहन चौधरी या रिक्षा चालकांच्या कुटुंबातील मुलांनाच निवडले आहे. हे सर्व आणि वैभव साळके, अभिषेक सिंगवी अशा सर्वांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आव्हान पेलले आणि तेही एक रुपयाही मोबदला न घेता. आधी पत्रकार परिषदेत अशी सेवा देऊ इच्छिणाऱ्या रिक्षाचालकांना ९८५९१९८५९१ या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले गेले. त्याच बरोबर महोत्सवा जवळच्या ३ सीएनजी पंपावर या आशयाचे मोठे फलक लावण्यात आले.

 

रिक्षा तळांवर सहभागा विषयी बैठकाही घेण्यात आल्या. या सर्वातून व आधी उपलब्ध असलेल्या रिक्षाचालकांच्या माहिती संग्रहाचे विश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून केले गेले. उत्सवाच्या ठिकाणी दारातच रिक्षा प्रवासी सहाय्य कक्ष उभारण्यात आला. तेथे रसिक प्रवेश करताच ज्यांना रिक्षा पाहिजे त्यांचे परत जाण्याचे ठिकाण,वेळ व संपर्क क्रमांक याची नोंद करण्यात येत होती. त्याची उपलब्ध रिक्षा चालकांच्या यादीतील रिक्षांशी सांगड घालून त्या रिक्षा चालकाला प्रवासी भाड्याचे वेळ, ठिकाणाचे निरोप दिले गेले. पण सवाईला मिळालेला आणि म्हणून परतीच्या प्रवासाची सोय हवी असलेल्यांच्या प्रतिसाद इतका प्रचंड होता.की रिक्षा संख्या अपुरी पडू लागल्यावर आपल्या दोन वा चारचाकी वाहनातून उत्सवाला आलेल्या रसिकांना सहकार्य मागण्यात आले. या तरुणांची तळमळ बघून यातील बहुतांश वाहनधारकांनी आपल्या सहश्रोत्यांना, सहजपणे सहप्रवासी म्हणून स्वीकारले. आणि पुणे शहराच्या चारी दिशांना असलेल्या कोथरूड,पाषाण,धायरी, वाकड, वडगावशेरी ,बाणेर,

 

नवी सांगवी,लोहगाव,विश्रांतवाडी ,वाघोली, पिंपळे गुरव,निगडी,कोंढवा,कात्रज इ. सह मध्यवर्ती पेठातील आपापल्या घरी श्रोते सुखरूप पोहचले.आणि यातून माणुसकीच्या सहप्रवासाचा पुणे पॅटर्न उदयाला आला.या तरुणांनी केलेल्या परिश्रमाला पुणेकरांनी भरभरून दादही दिली. वयस्कर मंडळींनी गालावर हात फिरवून कौतुक केले.

 

तर काही महिलांनी शेवटच्या दिवसात घरून करून आणलेला खाऊ दिला. स्वतःबरोबर या स्वयंसेवकांचे फोटो काढत त्यांच्या कामाची नोंद घेतली गेली. हा फक्त कौतुकाचा सोहळा राहिला नाही. तर या उपक्रमामुळे प्रदूषणाला काहीसा लगाम घातला गेला. विनिता लुल्ला या पर्यावरण अभ्यासिकेच्या विश्लेषणानुसार खासगी वाहने वापरण्यावर या उपक्रमाने जे नियंत्रण आणले. त्यामुळे २३०. ६ किलो कारबन फूट प्रिंट कमी झाला .