बारामती लोकसभा मतदार संघातील पाणी योजना आणि धरणांचे प्रश्न तातडीने सोडवावेत पाटबंधारे अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या सूचना

Share this News:

पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदार संघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी आणि टेमघर ही धरणे आणि पाणी योजनांबाबत विविध प्रश्नांवर तोडगा काढावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्या. पुण्यातील सिंचन भवन येथे त्यांनी आज पाटबंधारे विभागतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी वेगवेगळ्या कामांबाबत सूचना केल्या.

कृष्णा खोरे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक अन्सारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय चोपडे, अधिक्षक अभियंता कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, शिवाजीराव डुबल, कानिटकर, शेटे, धोडपकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणिकराव झेंडे, रणजीत शिवतारे, सचिन दोडके, नाना भूरूक आप्पासाहेब पवार, मोकाशी आदी या बैठकीस उपस्थित होते.

भाटघर तसेच गुंजवणी धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत. यांपैकी गुंजवणी धरणग्रस्तांना घरांसाठी जागा दिल्या आहेत, तरी त्या अद्याप त्यांच्या नावावर केलेल्या नाहीत. त्या लवकरात लवकर नावावर करण्यात यावे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी सध्या रिकामे करण्यात येत आहे. ते करत असताना या पाण्यावर अवलंबून असलेल्या मागील काही गावांतील नागरिकांचे तसेच शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे, तरी धरण रिकामे करताना प्रथम त्यांच्यासाठी पाण्याची सोय होणे अत्यावश्यक आहे. मुळशी भागातील स्थानिक शेतकऱ्यांना पिण्यासाठी मुळशी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी पलब्ध करून द्यावे, आदी मागण्यावजा सूचना सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत केल्या. खडकवासला जुन्या कालव्याच्या लाभ क्षेत्रापर्यंत नवीन मुठा उजवा कालवा एक्सेस करण्यात यावा, तसेच या धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी सणसरकट कालव्यातून सोडण्यात यावे. याशिवाय जनाई शिरसाई योजनेतून सध्या काही गावांना आणि तेथील शेतीला पाणी दिले जाते. त्यात आणखी काही गावे वाढवावीत, असे सुप्रिया सुळे यांनी सुचविले. जनाई शिरसाई कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करण्यात यावे. ते दुरुस्त केल्यास वाचणारे पाणी अनेक वंचित गावांना पुरवता येईल, असेही सुळे यांनी यावेळी सुचवले.

चौकट
पडझडीची दुरुस्ती तातडीने करावी
कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांची पडझड झाली आहे, त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. याशिवाय गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांचीही दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. अशा सूचना सुप्रिया सुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.