बारामती परिमंडलातील 23.51 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा

Share this News:

बारामती, दि. 18 सप्टेंबर 2019 : महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या बारामती परिमंडलातील 23 लाख 51 हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. यामध्ये बारामती मंडलमधील 5 लाख 27 हजार 179 वीजग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उर्वरित वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना वेळोवेळी ‘एसएमएस’द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी, बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, दरमहा वीजबिलाचा व वीजबिल भरण्याच्या मुदतीचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नियमाप्रमाणे नोटीस आदींची माहिती निशुल्क देण्यात येत आहे.

यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तसेच वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे. बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर व सातारा जिल्ह्यासह बारामती, दौंड, शिरुर, इंदापूर, पुरंदर व भोर तालुक्यात (जि. पुणे) 18 लाख 41 हजार 671 पैकी 17 लाख 79 हजार 812 (96.64 टक्के) अकृषक ग्राहकांनी तर 7 लाख 2 हजार 781 पैकी 5 लाख 71 हजार 656 (81.34 टक्के) कृषी ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.

बारामती मंडल अंतर्गत बारामती, दौंड, शिरुर, इंदापूर, पुरंदर व भोर तालुक्यात (जि. पुणे) सर्व वर्गवारीतील 5 लाख 77 हजार 354 पैकी 5 लाख 27 हजार 179 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये सासवड विभाग – 1 लाख 42 हजार 585, बारामती – 1 लाख 94 हजार 912 आणि केडगाव विभागामधील 1 लाख 89 हजार 682 वीजग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ऍ़पद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे