“हेल्मेट घाला धोका टाळा” शारदानगरचा अभिनव उपक्रम
शारदानगर (दि.18) : शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट घाला धोका टाळा हा उपक्रम राबविला. बारामतीतील तीन हत्ती चौक , भिगवण चौक येथे स्वयंसेविकांनी हेल्मेट न घातलेल्या दुचाकी वाहन चालकांना अडवून हेल्मेट घालण्याविषयी जागृक केले.
हेल्मेट न घातल्यामुळे जिवास धोका होऊ शकतो, वाहनाचे नुकसान होऊ शकते अशा प्रकारचा संदेश प्रत्येक वाहन चालकास दिला. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ट्रॅफिक पोलिसांबरोबर चौकात उभे राहून वाहने नियंत्रित केली. यासाठी स्वयंसेविकांनी तोंडी संदेशाबरोबरच हेल्मेट घालण्याविषयी संदेश देणारे पोस्टर बनवून आणले होते. रस्त्यांने जाणाऱ्या पादचाऱ्यांना पोस्टर दाखवून हेल्मेट घाला हा संदेश देऊन या जनजागृतीत सामिल करून घेतले.
सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ. अश्लेषा मुंगी , प्रा. व्हि. पी. गायकवाड यांनी नियोजन केले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख मा. राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे व महाविद्यालयाचे प्राचार्य रा. बा. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.