तब्बल १८ कोटी सामुहिक नामजपाच्या संकल्पाने गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प.पू.परिक्रमाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी वेद घोष केलेल्या सिद्ध मंत्राचा १८ कोटी नामस्मरणाचा संकल्प करुन दगडूशेठ दत्तमंदिराच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला. श्री क्षेत्र दत्तधाम, कारेगाव, परभणी येथील श्री मकरंद महाराज यांनी मागील वर्षी केलेला हा संकल्प अॅड.प्रसन्न हुशिंग यांच्या नेतृत्वाखाली दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत दत्तभक्त पूर्ण करणार आहेत.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२२ व्या वर्षानिमित्त आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाचे उद््घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीनिवास अग्रवाल, श्री क्षेत्र दत्तधाम, कारेगाव, परभणी येथील श्री मकरंद महाराज यांच्या हस्ते मंदिरासमोरील उत्सवमंडपात झाले. यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत अगस्ते, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.दिलीप हांडे, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, विश्वस्त अॅड.एन.डी.पाटील, चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्तमहाराजांची माध्यान्ह आरती करण्यात आली. उत्सवात भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम असे सादरीकरण १६ जुलै पर्यंत दररोज उत्सव मंडपात होणार आहे.
श्रीनिवास अग्रवाल म्हणाले, कलियुगात नामस्मरणाशिवाय माणसाचा उद््धार आणि कामाला गती नाही. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर सारखे संस्थान असे उपक्रम राबवित असून यामध्ये दत्तभक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.
अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, गुरुचरणी लीन होऊन प्रत्येकाने आपले आयुष्य सार्थकी लावावे. दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवात अनेक समाजोन्मुख कार्यक्रम घेतले जातात. उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरीता उत्सवात प्रयत्न केला जातो. सोमवार, दिनांक १५ जुलै पर्यंत उत्सवात विविध कार्यक्रम होणार मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमा उत्सवात पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अॅड.एन.डी.पाटील यांनी आभार मानले.