विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे महाराष्ट्र सायबरमार्फत

Share this News:

मुंबई, दि. 10/8/2019 : शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी क्विक हिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर यांच्यातर्फे “सायबर सुरक्षितता आणि जागरूकता” याविषयावर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. राज्यातील विविध शाळांमधून या कार्यशाळांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबद्दल जनजागृती होत आहे.

सायबर सुरक्षेबद्दल माहिती होण्यासाठी राज्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. या कार्यशाळांमध्ये सायबर गुन्हे कसे घडतात? त्याचा परिणाम काय होतो? असे हल्ले थांबवण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात? यासारख्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सायबर कडून केले जात आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे सायबर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. घावटे यांनी कर्वेनगर येथील के.बी. जोशी महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत सायबर गुन्हे आणि सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन केले. क्विक हिल फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा दाणी ह्यांनी व्हायरस, सोशल मीडियाचा वापर, ऑनलाईन माध्यमांद्वारे होणारी फसवणूक आणि इंटरनेटचे व्यसन या विषयांवर मार्गदर्शन केले. या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.

जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कुल ऑफ कंप्युटर सायन्सेस येथे झालेल्या कार्यशाळेत सायबर सेलचे पोलीस अधिकारी अंगद नेमाने यांनी जळगाव जिल्ह्यात झालेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत गुन्हेगार काय तंत्र वापरून कसे फसविले जाते, याचे उदाहरण दिले. तसेच अशा घटनांविरुद्ध कशा प्रकारे उपाययोजना कराव्यात, याविषयी माहिती दिली. श्रीमती दाणी यांनी वयोगटानुसार शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि जागरूकतेची महत्व विविध उदाहरणांद्वारे सांगितली. या कार्यशाळेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रसंगी सायबर सेलचे अधिकारी दत्तात्रय परदेशी, दिलीप चिंचोले, स्कुल ऑफ कंप्युटर सायन्सेस चे विभागप्रमुख डॉ. सतीश कोल्हे, डॉ. मनीषा जोशी, प्रा. चेतना जोशी उपस्थित होते.

राज्यात नागपूर, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी सुद्धा एक दिवसीय कार्यशाळा घेतल्या गेल्या असून त्याद्वारे आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले गेले आहे.