पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Share this News:

मुंबई, दि. 9/8/2019 : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, (एनडीआरएफ) राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), सैन्यदल, नौदल, कोस्टगार्ड या टीम कार्यरत आहेत. या टीमच्या माध्यमातून बचावकार्य गतीने सुरु आहे, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून दिली आहे.

सांगली व कोल्हापूर येथील पूर नियंत्रक बचाव पथक

एनडीआरएफच्या 22, नौदल 26, कोस्टगार्ड 11, सैन्यदल 8, एसडीआरएफ 3 या टीमच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे.

एनडीआरएफच्या जिल्हा निहाय संख्या

सांगली-16, कोल्हापूर-6, मुंबई-1, नाशिक-1, पुणे-1, पालघर-1, ठाणे-1, रायगड-1, सिंधुदुर्ग-1, सातारा-1, नागपूर-1 अशा एनडीआरएफच्या 31 टीम कार्यरत आहेत.

या टीममध्ये ओडीसाच्या एअरलिफ्ट 5, पंजाबच्या एअरलिफ्ट 5 आणि 2 टीम गुजरात येथून निघाल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात बचावकार्य सुरु असताना ग्रामपंचायतीची बोट बुडून 9 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना असून बचावकार्य सुरु असताना बोटीत झाडाची फांदी अडकल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मदत देण्यात येईल. पुर परिस्थितीवर नियंत्रण असून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत. मदत कार्यासाठी आणखी पथके मागणविण्यात आली आहे. तसेच पुरग्रस्तांना स्वच्छ पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे कक्षातून सांगितले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक अभय यावलकर सतत माहिती घेत असून जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी राज्यातून मागणी आहे त्या नुसार टीमची नियुक्ती करण्यात येत असून पूर परिस्थितीबाबतचा सतत आढावा घेण्यात येत आहे.