सुनील माने यांच्या संयोजनातून साधला विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे ता. १९: शाळेतून थकले-भागलेले चेहरे सभागृहात येऊन शांत बसले होते खरे. पण इथे कोण येणारं आहे?, आपल्याशी काय बोलणार आहेत? याबाबत असणारी प्रचंड उत्सुकता त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. इतक्यात ‘ ते ‘ आले. आपला सगळा व्याप बाजूला ठेवत त्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला. अगदी हलक्या फुलक्या टीप्स देत त्यांनी यशस्वी आयुष्याचा कानमंत्र दिला. आणि यात रमलेल्या विद्यार्थ्यांना ‘ बापट ‘ मास्तरांची शाळा कधी संपली हे कळालेसुद्धा नाही.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत भारतीय जनता पक्षाचे सदस्य व कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संयोजनातून झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. बुद्ध भूषण समाज मंडळ, बोपोडी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी थोर व्यक्तिमत्वांची चरित्र व शालोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, राजश्री कांबळे, उषा शेलार, उमेश कांबळे, काका कांबळे, अण्णा आठवले, नाना शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना बापट म्हणाले की, आई वडिलांचा आदर करा, वेळेचे नियोजन करा, नियमित व्यायाम करा, अभ्यासासोबत अवांतर वाचन ही करा, सर्वांशी प्रेमाने बोला, सदैव प्रमाणिकपणाची कास धरा या आज छोट्या-छोट्या वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनवतील. प्रत्येकाला आपल्या कष्टाने व कर्तृत्वाने पुढे जाता येते. देश व समाज याकरिता आपले आयुष्य उपयोगी पडले पाहिजे हे ध्येय असावे. यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत आवश्यक आहे. असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
माने म्हणाले की, तरुण संपत्तीचा आपण योग्य वापर करून घेतल्यास २०२० मध्ये देश महासत्ता होईल, असे स्वप्न भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांनी पहिले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच स्वप्न घेऊन कार्यरत आहेत. या प्रेरणेतून, भविष्यात उज्ज्वल पिढी घडवून देश महासत्ता व्हायचा असेल तर शालेय वयापासून विद्यार्थ्यांवर संस्कार करणे आवश्यक आहे.