‘एक सूर एक ताल’मधून भारतीय संगीत संस्कृतीचे दर्शन
पुणे : ‘एक तुतारी द्या मज आणुनी’ हे मराठीतील स्फूर्तिदायक गीत, ‘वैष्णव जन तो तेने कहियो’ हे लोकप्रिय भजन, ‘आकाशकेहू नीता’ हे प्रसिद्ध कन्नड गीत, ‘मानुहे मनुहोर बाबे’ हे आसामी गीत, ‘भारोतेरी माटीर घोरे’ बंगाली गीत, ‘पारुक्कुल्ळे नल्ला नाहू’ हे तामिळी गीत, ‘इक बाग है यह दुनिया’ हे जगाचे वर्णन करणारे हिंदी गीत, ‘अमे गीत गगन नां गाशु’ हे गुजराती गीत, ‘ढोलिया वे ढोलिया’ हे थिरकायला लावणारे पंजाबी गीत सादर करीत विविधतेतून एकता जपणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
निमित्त होते, युवक बिरादरी, भारत आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट (अंडरग्रॅज्युएट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक सूर एक ताल’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे. आठ भारतीय भाषांमधील रचना सादर करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकली. या लोकप्रिय गीतांचे गायन करतानाच विद्यार्थ्यांनी त्यावर उपस्थितांना तालही धरायला लावला. एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात हे सादरीकरण झाले. एकूण आठ भाषांतील आठ गीते आणि तीन भजनाचे सादरीकरण झाले. त्यासाठी आधी दोन दिवस त्यांचा सर्व करून घेण्यात आला. अतुल सुंदरकर, एकता जोशी व सहकाऱ्यांनी गायन केले. संगीत सर्वजीत मौर्य, कृष्णा रत्नपारखी यांनी दिले. भरतनाट्यम गुरु सरिता बाला, संयोगिता पटेल यांनी कोरियोग्राफी केली. अक्षय जाधव यांनी नृत्य केले. लीना शेट्ये यांनी दिग्दर्शन केले.
यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, ‘एमआयटी’चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, प्र-कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, अधिष्ठाता डॉ. कल्याण स्वरुप, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ अंजली साने, बिरादरीच्या स्वर क्रांती, संयोजिका प्रा. कल्याणी बेलसरे आदी उपस्थित होते.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “सगळ्याना एकत्र आणणारी ही कल्पना आहे. गीत आणि संगीत यांना जोडणारा दुवा या कार्यक्रमात दिसला. मानवतेचा संदेश देणारा हा मिलाफ आहे. बहुभाषिक देशात प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती असून, त्याची देवाणघेवाण होतेय, हे मानवतेचे लक्षण आहे.”
डॉ. विशवनाथ कराड म्हणाले, “संगीत साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांतरसाची अनुभूती मिळते. या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. पाश्चिमात्य संगीताच्या जमान्यात भारतीय सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम येथे झाला. ‘वैष्णव जन तो’, ‘एक तुतारी द्या मज आणूनी’ अशी स्फूर्तिदायी गीते ऐकून भारावून गेलो.”