पुणे शिक्षक-पदवीधर निवडणूकीसाठी अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करावी विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे दि. 18: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी होण्यासाठी यासंबंधित विविध संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी संदर्भात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पदवीधर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुना क्रमांक 18 मध्ये नाव नोंदणी करावी. तर शिक्षक मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठी पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुना क्रमांक 19 मध्ये नाव नोंदणी करावी. गठ्ठा पध्दतीने सादर केल्या जाणाऱ्या अर्जदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी विचारात घेतली जाणार नाहीत.

अर्जाच्या छापील प्रती (नमुना १९) मतदार नोंदणी अधिकारी किंवा पद निर्देशित अधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करुन घेता येऊ शकतील. अथवा हस्तलिखित, टंकलिखित, चक्रमुद्रित किंवा खाजगी रीतीने छापलेले नमुने देखील स्वीकारले जातील, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, पहिली यादी निर्दोष तयार होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून परिपूर्ण भरलेले अर्ज वेळेत म्हणजेच 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावेत, असे सांगून पदवीधर, शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणी बाबत डॉ. म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले.

श्री. चव्हाण म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या प्रश्नांची उत्तरे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या www.divcommpune.in या वेबसाईटवर दिली जात आहेत. याबाबत नागरिकांचे काही प्रश्न किंवा अडचण असल्यास या वेबसाईटद्वारे तसेच 1950 या दूरध्वनी क्रमांकावर शंकांचे निरसन केले जाईल.
बैठकीला बार असोसिएशन, इंजिनिअर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, शिक्षक संघटना, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंटेरीअर डेकोरेटर असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, पीपल्स असोसिएशन यांचे पदाधिकारी व प्रतिनिधींनी विविध प्रश्न विचारले, त्यास डॉ. म्हैसेकर यांनी समयोचित उत्तरे दिली.

Support Our Journalism Contribute Now