भरोसा व दामिनी पथक असताना महिलांनी स्वत:ला एकटे समजू नये : भरोसा सेलच्या प्रमुख विजया कारंडे 

पुणे 30/9/2019 : महिलांच्या नानाविध समस्यांवर भरोसा व दामिनी पथक कार्यरत आहे. ज्या ठिकाणी महिलांना असुरक्षित वाटते, त्याठिकाणाहून महिलांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्वरीत त्यांच्या मदतीसाठी जातो. त्यामुळे महिलांनी स्वत:ला कधीही एकटे समजू नये, भरोसा व दामिनी पथक सदैव महिलांसोबत आहे. वर्षभरात आलेल्या २३०० समस्यांपैकी २१०० समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे, असे भरोसा सेलच्या प्रमुख विजया कारंडे यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात आयोजित कार्यक्रमात भरोसा आणि दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी सन्मान करण्यात आला. यावेळी परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, भरोसा सेलच्या प्रमुख विजया कारंडे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, जन्मेंद्रराजे भोसले, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, डॉ.मिलिंद भोई, शुभांगी आफळे, प्रविण चोरबेले, संजय खंडेलवाल, राजेश रंजन आदी उपस्थित होते. सन्मान सोहळ्यानंतर प्रिया डिसा आणि सहकारी यांच्या शास्त्रीय नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्मिता शेवाळे म्हणाल्या, आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्या, तरी त्यांच्या सुरक्षेबाबत आजही आपण मागे आहोत. त्यामुळे त्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महिलाच पुढे येत असून दामिनीसारख्या पथकांच्या माध्यमातून काम करीत आहेत. महिलांच्या कौटुंबिक समस्येसोबतच करिअरमध्ये देखील त्यांना अनेक समस्या येतात. तरीही अनेक महिला यावर मात करतात. महिलांनी स्वत:मधील शक्ती ओळखली, तर त्या आणखी सशक्त होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. डॉ.मिलिंद भोई यांनी सूत्रसंचालन केले.