अनावश्यक खर्च टाळून शेतक-यांना मदतीचा हात द्या – आमदार महेश लांडगे

Share this News:

17/8/19, पिंपरी । प्रतिनिधी ।
सांगली, कोल्हापूर परिसरातील भीषण पूरामुळे हजारो शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. शेतातले पीक आणि गोठ्यातले पशुधन डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाले. त्या शेतक-याला आता मदतीची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गोशाळा आणि दहीहंडी उत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतक-यांना पशुधन उपलब्ध करुन द्यावे. त्याद्वारे बळीराजाच्या सेवेचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

सांगली, कोल्हापूर परिसरात यावर्षी पावसाने थैमान घातले. महापुरात अनेक गावांतील पशुधनाला मोठा फटका बसला आहे. शेकडो जनावरे वाहून गेली आहे. दगावलेल्या जनावरांचे पंचनामे सुरू आहेत. फक्त सांगली जिल्ह्यातील विचार करता दगावलेले पशुधन, कोंबड्या आदींची संख्या सुमारे दहा हजारांच्या पुढे आहे, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी आणखी मोठी आहे. शेतीला जोड व्यावसाय म्हणून पशुपालन केले जाते.

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघ तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील संवेदनशील नागरिकांच्या मदतीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्य पोहोच केले. तब्बल ३० टॅम्पोद्वारे त्या-त्या गावात स्वत: उपस्थित राहून आमदार लांडगे स्वत: आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. एका टॅम्पोमध्ये तीनशे ते साडेतीनशे कुटुंबांना उपलब्ध होईल इतके सामान पाठवण्यात आले. आमदार लांडगे, त्यांचे समर्थक नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे १५ हजार पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचली आहे.

सध्यस्थितीला आता पूरपरस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पशुपालन हा पूरक व्यावसाय आहे. पूर परिस्थितीत पशुधन मृत्यमूखी पडल्यामुळे शतकऱ्यांचा आर्थिक ‘कणा’च मोडला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पशुधन उपलब्ध व्‍हावे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळांनी प्राधान्याने हा उपक्रम हाती घेण्याचा संकल्प केला आहे.

काय केले आहे आवाहन?

राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळ, गोशाळा तसेच दहीहंडी उत्सव मंडळांनी विद्युत रोषणाई, गणपती आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, खर्चिक देखावे, विविध कार्यक्रम यावर होणारा मोठा खर्च या वर्षी कमी करावा. त्याआधारे राज्यातील शेतक-यांवर कोसळलेल्या संकटात त्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक मंडळाने किमान एका पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत म्हणून पशुधन भेट द्यावे. तसेच, राज्यातील गोशाळा व्यवस्थापनांनीही आपआपल्या परिने पूरग्रस्त शेतक-यांना पशुधन दान करावे. त्यामुळे शेतक-यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागणार आहे. आगामी एक महिन्याभरात पश्चिम महराष्ट्रातील गेलेले पशुधन परत मिळावे. त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळ, गोशाळा, दहीहंडी मंडळांनी पुढाकार घ्यावा.

आमदार महेश लांडगे म्हणतात (प्रतिक्रिया)

पूरपरिस्थितीत बाधित शेतक-यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. प्रशासकीय यंत्रना पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम घेतला. त्याला भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पूरामध्ये मृत्युमूखी पडलेल्या पशुधनाचा पंचनामा सुरू आहे. सरकारी यंत्रना त्यांच्यापरीने काम करीत आहे. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून मी माझ्या मतदार संघातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळ, गोशाळा यांना पूरबाधित शेतक-यांना पशुधन भेट देण्याचे आवाहन केले आहे. आम्ही आमच्या परिने हा उपक्रम राबवणार आहे. राज्यातील सर्वच गणेश मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळ, गोशाळां, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांनी हा उपक्रम हाती घेतल्यास शेतक-यांना ख-या अर्थाने दिलासा मिळणार आहे. त्यासाठी काही मदत लागल्यास माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा.
– महेश किसन लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.

पश्चिम महाराष्ट्राशी माझे ऋणानुबंध : आमदार लांडगे

पिंपरी-चिंचवड सारख्या ‘स्मार्ट सिटी’तील मी लोकप्रतिनिधी असलो तरी, लाल मातीशी माझी नाळ जुळली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये मी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राशी माझे ऋणानुबंध आहेत. सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकरी पशुधन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळातात हे मला माहीत आहे. अनेक शेतक-यांनी गुरांना कुठे सोडयचे म्हणून घर आणि गोठा सोडला नाही. पशुधन या शेतक-यांना जीवनाचा भाग आहे. मात्र, भीषण पुरामुळे होत्याचे नव्‍हते झाले. पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांत सांगली आणि कोल्हापूर भागातून मोठ्याप्रमाणात दूध पुरवठा केला जातो. एक दिवस दूध पुरवठा झाला नाही, तर शहरातील नागरिकांना समस्या निर्माण होते. त्यामुळे राज्यात सर्वाधिक गणेशोत्सव मंडळे पुणे आणि मुंबईत आहेत. प्रत्येकाने शेतक-यांना पशुधनाची मदत करण्याचे ठरवल्यास विधायक कार्य होणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

 

अन्‌ मंगळा गौरीचे कार्यक्रम केले रद्द!
गौरी आणि गपणतीच्या सणानिमित्त शिवांजली सखी मंचच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत मंचच्या अध्यक्ष पुजा महेश लांडगे यांच्या पुढाकाराने तब्बल ६५ कार्यक्रम नियोजित केले होते. मात्र, राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतकरी संकटात आहेत. त्यांना मदत करण्याबाबत मंगळागौरीचे कार्यक्रम रद्द करुन पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे. वास्तविक, महेश लांडगे यांच्या घरीसुद्धा पशुधन आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या ‘स्मार्ट सिटी’ चे प्रतिनिधीत्व करीत असले तरी, आमदार लांडगे यांच्या भोसरी मतदार संघात समाविष्ट गावांमध्ये अजूनही पशुपालन केले जाते. त्यामुळे शेतकरी आणि पशुधन याबाबत आमदार लांडगे यांना आत्मीयता आहे. त्यामुळे मंगळा गौरीचे सर्व कार्यक्रम आम्ही रद्द करुन पूरबाधित शेतक-यांना मदत करण्याबाबत शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून पशुधन भेट उपक्रमात सहभागी होणार आहोत, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांनी दिली.