जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांना वाहिली दीपांद्वारे आदरांजली 

Share this News:
इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने जालियनवाला बाग… शताब्दी एका वेदनेची हा कार्यक्रम ; एक हजार दीपांद्वारे आदरांजली
पुणे : भारत माता की जय… वन्दे मातरम्… इन्कलाब जिंदाबाद… अशा घोषणा देत जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये शहीद झालेल्या लोकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाली तरी देखील अजूनही ही वेदना मनात सलत असल्याने अनेकांच्या डोळ्यासमोर तो रक्तरंजित इतिहास उभा राहिला. जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांना दीपमानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.
इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेला १३ एप्रिल रोजी १०० वर्षे पूर्ण होत असून घटनेच्या पूर्वसंध्येला जालियनवाला बाग… शताब्दी एका वेदनेची या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार पेठेतील रमणबाग प्रशाला येथे करण्यात आले होते. यावेळी एक हजार पणत्या प्रज्वलित करुन जालियनवाला बागेतील पवित्र माती आणि शहिद उधमसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इतिहास प्रेमी मंडळचे मोहन शेटे, यांसह विद्यार्थी व पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
मोहन शेटे म्हणाले, भारतावर १५० वर्षे राज्य करणा-या जुलमी ब्रिटीश राजवटीतील सर्वात महाभयंकर घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेने इंग्रजांचे खरे रुप उघडे पडले. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजारो लोक मृत्युमुखी पडले. सारा देश या सैतानी अत्याचारांनी हादरला. सर्वत्र पसरलेल्या संतापाच्या लाटेतूनच असहकार आंदोलनाच्या ज्वाला धगधगू लागल्या. शहीद भगतसिंग आणि शहीद उधमसिंग सारखे तेजस्वी क्रांतीकार या हत्याकाडांमुळेच पेटून उठले. या घटनेच्या शताब्दी वर्षी शहिदांना आदरांजली अर्पण करण्याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंग्लंड सरकारने या घटनेचा नुसता खेद व्यक्त न करता माफी मागावी असेही ते म्हणाले.