रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि चिंचवडच्यावतीने मतदान जनजागृती अभियान
पिंपरी, ता. 13 – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी क्वीनस्टाईन सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि चिंचवड, वॉकिंग ग्रुप, ट्रेकिंग ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे मत-माझा अधिकार’ या उपक्रमांतर्गत आज (दि. 13 ) मतदान जनजागृती अभियान चिंचवड येथील क्वीनस्टाईन सोसायटीमध्ये राबविण्यात आले.
चिंचवड येथील क्वीनस्टाईन सोसायटीत झालेल्या मतदान जनजागृती अभियानाच्यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रभारी कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, सचिव नेहुल परमार, रो. संजय खानोलकर, डॉ. संजीव दाते, रो. शिल्पागौरी गणपुले, रो. प्रसाद गणपुले, रो. सुरेंद्र शर्मा, क्षितिज शर्मा, सोसायटीचे अध्यक्ष सुजीत पाटील, क्वीनस्टाईन सोसायटीतील रहिवासी आदी उपस्थित होते.
यावेळी अण्णा बोदडे म्हणाले,”आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी इव्हीएमसोबत “व्हीव्हीपीएटी’ (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली जाणार आहे. त्यानुसार इव्हीएमच्या बाजूलाच “व्हीव्हीपीएटी’ जोडले जाणार आहे. मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या “व्हीव्हीपीएटी’च्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत 7 सेंकद दिसणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपण नोंदवलेले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाल्याची खात्री पटणार आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे.” त्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून संसदपटू होण्यासाठी मतदारांनी योग्य त्या उमेदवाराला मत द्या असे आवाहनही यावेळी केले. तसेच मतदानाची शपथ घेण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, “मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. या दृष्टीने मतदार जनजागृतीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.”