व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनची सुरूवात

Share this News:

राज्य शासन व कार्पोरेट कंपन्यांच्या सहाय्याने खेड्यांचा सर्वांगिण विकास
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराला कार्पोरेट कंपन्यांचे सहकार्य
‘सहभाग’ संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसोबत खाजगी कंपन्यांच्या सहाय्याने खेड्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा नाविन्यपूर्ण अशा व्हिलेज सोशल ट्रान्फॉर्मेशन मिशनचा प्रारंभ करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रमुख उद्योजकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रारंभीच्या टप्प्यात राज्यातील एक हजार गावांचा कायापालट खाजगी सहभागाने करण्यात येणार आहे. शासनाच्या योजना राबविण्यात येत असताना काही घटकांबाबत शासन सहाय्यांच्या पलीकडील बाबींची आवश्यकता असते. ही दरी खाजगी कंपनी भरून काढू शकतील. यासाठी हे अभियान सुरू करण्यात येत आहे.

राज्यातील गावांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग, कंपन्या या निमित्ताने एकत्रित आले असून त्याची सुरुवात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे आणि त्याच्या www.sahabhag.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करून झाली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या पुढाकाराला कार्पोरेट कंपन्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी यावेळी झालेल्या बैठकीत दर्शविली असून प्रारंभी एक हजार गावे ही ‘मॉडेल व्हिलेज’ करण्यासाठी या कंपन्या सरसावल्या आहेत.

कार्पोरेट कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील खेडेगावांचा विकास करण्यासंदर्भात ‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन’संदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्यासह महानायक अमिताभ बच्चन, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा, महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा, हिंदुस्थान लिव्हरचे संजीव मेहता, बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला, जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल, भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य, व्हिडीओकॉनचे प्रमुख राजकुमार धूत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, सध्या गावांचा विकास हा शासन व सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्या यांच्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून विकास करण्यात येत आहे. मात्र, गावांच्या शाश्वत विकासासाठी या सर्वांना एकत्रित करून विकास व्हावा, अशी या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या गावांचा विकास करत असताना त्यात ग्रामसभेलाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून गावांचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे जलयुक्त शिवार कार्यक्रमाने दिसून आले आहे. त्यामुळे गावांना काय हवे आणि ते कशाप्रकारे करता येईल, याची योजना गावांनाच करायची आहे. एका निश्चित कालावधीत हा विकास करण्यात येणार असून त्याला क्लस्टरचे स्वरुप द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

येत्या 2 ऑक्टोबरपासून किमान 100 गावांमध्ये हे अभियान सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जल, जंगल, जमीन यांच्या माध्यमातून शाश्वत विकास करून गावांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून जलसंधारण, कृषी क्षेत्राच्या आणि कौशल्य विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

हे अभियान राबविण्यासाठी मेकॅनिझम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलची स्थापन करण्यात येणार आहे. एक हजार गावांपैकी 50 टक्के गावे ही सहभागी कार्पोरेट कंपन्या निवडणार असून उर्वरित 50 टक्के गावे ही मनुष्यबळ विकास निर्देशांकातील कमी निर्देशांक असलेल्या गावांतून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये 25 टक्के गावे ही आदिवासी असणार आहेत. या कामासाठी एकत्रित निधी उभारण्यात येणार असून त्याचे स्वरूप व विनियोगाची पद्धत तसेच या अभियानाचे स्वरूप, अंमलबजावणीची पद्धत आदी बाबी गव्हर्निंग कौन्सिल ठरविणार आहे.

यासंदर्भात झालेल्या बैठकीत श्री. रतन टाटा, आनंद महिंद्रा, राजश्री बिर्ला, सज्जन जिंदार, रोनी स्क्रूवाला, राजकुमार धूत यांच्यासह विविध मान्यवरांची या अभियानासाठी मोलाच्या सूचना केल्या. या अभियानात आर्थिक बरोबरच सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे जाहीर केले. श्रीमती बिर्ला यांनी बैठकीतच 300 गावांचा विकास आदित्य बिर्ला ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अभिनेता अमिताभ श्री. बच्चन म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांमध्ये मी सहभागी झालो आहे. मात्र या उपक्रमाची संकल्पना अतिशय वेगळी आहे. या उपक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धी करणे आवश्यक असून त्यासाठी माझ्या कौशल्याचा, आवाजाचा उपयोग करून घेण्यासाठी माझी सर्व सहमती आहे.

मुख्य सचिव श्री. क्षत्रिय यांनी या अभियानाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की, खेड्यांच्या विकासात सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्या यांचा सहभागामुळे परिणामकारक बदल घडून येतील. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी ‘महाराष्ट्र : व्हिजन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या विषयावर सादरीकरण केले. विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी संकेतस्थळाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांनी आभार मानले.

सोशल ट्रान्फॉर्मेशन मिशनची वैशिष्ट्ये

अभियानाचा उद्देश
– राज्यातील अविकसीत 1 हजार गावांचा सर्वसमावेशक विकास करून त्यांचा कायापालट करणे

निधी व्यवस्थापन अंमलबजावणी पद्धत –
या अभियानाच्या निधी व्यवस्थापनासाठी व अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्निंग कौन्सिलची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच विविध छोट्या छोट्या गटांच्या माध्यमातून अंमलबजावणीची पद्धत ठरविण्यात येणार आहे.

अभियानातील कामे
– गावांचा सामाजिक विकास करणे तसेच दुष्काळमुक्त करून संपूर्ण जलसुरक्षा प्रदान करण्यात येणार आहेत.
– संपूर्ण जलसुरक्षेसाठी मॉडेल विकसित करणार त्यासाठी मनुष्यबळाचा विकास करणार
– गावातील लोकांना कौशल्यपूर्ण करणे तसेच
– ग्रामस्थांच्या सहभागातून जल, जंगल व जमिनीचा विकास करणार
– नैसर्गिक पद्धतीने जलपुनर्भरण, जलस्त्रोताचे बळकटीकरण
– घनकचरा व्यवस्थापन, हागणदारी मुक्त गाव उपक्रमास चालना देणार
– कृषी आधारित पूरक यंत्रणा निर्माण करणार